मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी सत्तार मुंबईत दाखल; दुपारनंतर कळणार नाराजीनाट्याचा 'मास्टरमाईंड'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2020 11:15 AM2020-01-05T11:15:02+5:302020-01-05T11:18:05+5:30
मी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे, उद्धवजींशी चर्चा करुन बोलेन अशी भूमिका सत्तारांनी मांडली आहे.
मुंबई: शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याच्या बातमीने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं होतं. कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्याने अब्दुल सत्तार नाराज असल्याचे बोलले जात आहे. तर अब्दुल सत्तार मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी मुंबईत दाखल झाले असून माझ्या राजीनाम्याच्या पुड्या सोडणाऱ्यांचा दुपारनंतर खुलासा करणार असल्याचे सत्तार म्हणाले आहे.
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर महाविकास आघाडीमधील शिवसेना, राष्ट्रावादी काँग्रेस आणि काँग्रेस या घटकपक्षामधील अनेक नेत्यांची नाराजी समोर आली होती. दरम्यान, मंत्रिमंडळात स्थान मिळूनही केवळ राज्यमंत्रिपद मिळाल्याने शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला असल्याचे बोलले जात आहे.
तर माझ्या राजीनाम्याच्या पुड्या सोडल्या जात आहेत. मी आज कोणालाही काहीही उत्तर देणार नाही, वेळ येईल तेव्हा सर्व प्रश्नाची उत्तरं देईन, मी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे, उद्धवजींशी चर्चा करुन बोलेन अशी भूमिका सत्तारांनी मांडली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर सत्तारांच्या नाराजीनाट्याचा 'मास्टरमाईंड' कोण ? हे कळणार आहे.
त्यामुळे सत्तार हे उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मुंबईत पोहचले असून, ठाकरेंच्या भेटीनंतर नाराजीनाट्याचा बातम्या पेरणाऱ्यांबद्दल बोलणार असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर सत्तार काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.