चौरंगी लढतीत दीपक केसरकरांची बाजी, मोठ्या मताधिक्यासह मिळवला विजय
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 02:23 PM2024-11-23T14:23:35+5:302024-11-23T14:34:34+5:30
Sawantwadi Assembly Election 2024 Result Live Updates: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लक्षवेधी ठरलेल्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्य सरकारमधल मंत्री दीपक केसरकर यांनी बाजी मारली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लक्षवेधी ठरलेल्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्य सरकारमधल मंत्री दीपक केसरकर यांनी बाजी मारली आहे. दीपक केसरकर यांनी एकतर्फी लढतीत शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजन तेली यांना पराभवाचा धक्का दिला आहे. येथे बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवणारे भाजपाचे युवा नेते विशाल परब यांनीही येथे लक्षणीय मतं घेतली. तर अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या अर्चना घारे परब ह्या चौथ्या क्रमांकावर राहिल्या.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात यावेळी चौरंगी लढत झाल्याने, तसेच मोठ्या प्रमाणावर अँटी इन्कम्बन्सी असल्याने दीपक केसरकर यांच्यासाठी निवडणूक ही आव्हानात्मक ठरणार असं बोललं जात होतं. त्यात केसरकर यांना उमेदवारी जाहीर होताच भाजपामधून इच्छूक असलेल्या राजन तेली यांनी ठाकरे गटात प्रवेश करत उमेदवारी मिळवली. तर भाजपाच्या विशाल परब यांनी बंडखोरी केल्याने केसरकर यांची वाट बिकट दिसत होती. मात्र आज झालेल्या मतमोजणीमध्ये दीपक केसरकर यांनी सुरुवातीपासून आघाडी घेतली.
मतमोजणीदरम्यान प्रत्येक फेरीअखेर दीपक केसरकर यांची आघाडी वाढत गेली. चौरंगी लढतीमध्ये मतांची विभागणी होईल, असा अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र प्रत्यक्षात केसरकरांची मते एकगठ्ठा राहिली तर इतर उमेदवारांच्या मतांचं विभाजन झालं. अखेर २३ फेऱ्यांची मतमोजणी आटोपल्यानंतर दीपक केसरकर यांची आघाडी ३९ हजार ८९९ हजारांपर्यंत गेली. तर राजन तेली दुसऱ्या आणि विशाल परब हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले.