इंदापूर : दोन वर्षांच्या कालावधीनंतर उजनी पाणलोट क्षेत्रातील कांदलगाव परिसरात बुधवारी (दि.२) दिवसाढवळ््या दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाल्याने, परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.कांदलगावातील पाणलोट क्षेत्रामधील जयदीप बाळासाहेब पाटील यांच्या शेतात हा बिबट्या दिसला. एका बोकडाचे रक्त प्राशन केल्यानंतर त्याच ठिकाणी तो बराचवेळ रेंगाळला. त्याच्या पावलांचे ठसे तेथे उमटले आहेत.चाहूल लागताच तो पिकामध्ये लपला असे ग्रामस्थांनी सांगितले. दोन वर्षांपूर्वी पाटील यांच्याच शेतात एक बिबट्या वसाहतीला आला होता. आत्ता पुन्हा एकदा बिबट्या दिसल्याने ग्रामस्थ धास्तावले आहेत. उजनी धरणक्षेत्र परिसर ऊसपट्टा म्हणून ओळखला जातो. तसेच नदी प्रवाहाच्या परिसरातही मोठ्याप्रमाणावर ऊसाचे क्षेत्र आहे. या परिसरात बिबट्याच्या वसाहतीस अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे तातडीने वन विभागाने याची दखल घेऊन शहानिशा करावी. तसेच याठिकाणी पिंजरा लावण्यात यावा अशी मागणीही परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)
कांदलगावात बिबट्याची दहशत
By admin | Published: November 03, 2016 1:28 AM