शाळांची घडी पुन्हा बसवावे लागणार; शिक्षक अतिरिक्त होण्याचा धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 10:30 PM2020-05-12T22:30:00+5:302020-05-12T22:30:02+5:30
विद्यार्थीच नाही तर शिकवणार कोणाला ?
राहुल शिंदे-
पुणे: राज्यातील प्रमुख शहरांमधून लाखो मजूर आपल्या कुटुंबासह स्थलांतरित झाल्यामुळे राज्यातील सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या कमी होणार आहे. तसेच शाळेतील विद्यार्थी घटल्याने शिक्षक अतिरिक्त होण्याचा धोका आहे. त्यामुळे लॉकडाऊननंतरच्या काळात स्थलांतरित झालेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच अतिरिक्त होणाऱ्या शिक्षकांच्या समायोजनाचा मोठा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
रोजगाराच्या शोधात पुणे, मुंबई सोलापूर ,नागपूर अशा विविध शहरांमध्ये आलेले मजूर लाखोंच्या संख्येने राजस्थान, बिहार ,कर्नाटक ,मध्य प्रदेश ,उत्तर प्रदेश आदी राज्यांमध्ये परतले आहेत. या मजुरांची मुले प्रामुख्याने राज्यातील सरकारी शाळांमध्ये शिक्षण घेत होती. मजुरांबरोबर त्यांची मुलेही इतर राज्यांमध्ये परत गेली आहेत. त्यामुळे मराठी व माध्यमासह हिंदी, बंगाली, कन्नड, तेलगू ,सिंधी आदी माध्यमांच्या शाळांमधील विद्यार्थी संख्याही कमी होऊ शकते,असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.
विद्यार्थी संख्येच्या आधारावर शाळांमध्ये शिक्षकांची नियुक्ती केली जाते. विद्यार्थीच नाही तर शिकवणार कोणाला ? त्यामुळे अनेक शाळांमधील शिक्षक अतिरिक्त होण्याचा धोका निर्माण झाली आहे. प्रामुख्याने मुंबईमध्ये पोट भरण्यासाठी आलेल्या गरीब मजुरांची मुले हिंदी ,गुजराती, तेलुगु ,तमिळ ,कन्नड आदी माध्यमाच्या सरकारी शाळांमध्ये शिक्षण घेतात. कोरोनामुळे निर्माण झालेल्या भीतीदायक वातावरणामुळे आणि बंद पडल्यामुळे उद्योगधंद्यामध्ये रोजगार नसल्यामुळे लाखो मजूर पायी किंवा मिळेल त्या वाहनाने आपल्या घरी परत चालले आहेत. त्यातील किती मजूर किंवा त्यांची मुले परत येतील; यावर भाष्य करणे सद्यस्थितीत शक्य नाही.
------------
मुंबईसह विविध शहरांमधून मजुरांचे लोंढे परराज्यात चालले आहेत. त्यामुळे राज्यातील विद्यार्थी संख्या कमी होईल,असा अंदाज आहे. विद्यार्थी कमी झाल्याने शिक्षकांच्या समायोजनाची मोठी समस्या निर्माण होईल. सद्यस्थितीत मुंबईत बरेचअतिरिक्त शिक्षक असून त्यात आता आणखी वाढ होणार आहे. मजुरांच्या स्थलांतराने शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा प्रश्न सुद्धा निर्माण होणार आहे.त्यामुळे या विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.
- दत्तात्रय जगताप, संचालक, प्राथमिक शिक्षण, महाराष्ट्र राज्य
--------
मुंबईसह राज्यातील विविध भागांमध्ये मजुरी करणाऱ्या गरीब मजुरांची मुले सरकारी शाळांमध्ये शिक्षण घेतात. त्यात मुंबईमधील हिंदी शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या मजुरांच्या मुलांची संख्या मोठी आहे. सद्यस्थितीत लाखो मजूर स्थलांतरित झाले आहेत. काही मजूर विविध शहरांमधून महाराष्ट्रातील आपल्या गावांमध्ये स्थलांतरित झाले आहेत. तर काही महाराष्ट्राबाहेर स्थलांतरित झाले आहेत. त्यामुळे सरकारी शाळांमधील विद्यार्थी संख्येमध्ये घट झाल्याचे दिसून येईल. त्यामुळे या शाळांची विस्कटणारी घडी बसविण्यासाठी सर्वांनाच पुढाकार घ्यावा लागणार आहे.
- एन के जरग, माजी माध्यमिक शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य
-----------
राज्यातील माध्यम निहाय शाळांची संख्या
माध्यम शाळांची संख्या
मराठी ८८ हजार २४१
इंग्रजी १४ हजार २८१
हिंदी १ हजार ७६९
उर्दू ५ हजार २४०
बंगाली ५५
गुजराती २६०
कन्नड ३३९
सिंधी २७
तमिळ ४०
तेलगू ६४
-------------------
बालभारतीतर्फे पुस्तके वितरीत केल्या जाणाऱ्या पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची माध्यम निहाय संख्या-:
मराठी - ६ लाख ८४ हजार
इंग्रजी - १४ लाख ९० हजार
हिंदी - ५ लाख ४५ हजार
उर्दू - ५ लाख ७२ हजार
गुजराती - ४५ हजार
कन्नड - ७ हजार ८००
तेलुगु - २ हजार ८००
तमिळ - १ हजार ५००