धनाजी कांबळे ।लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म दिन १४ एप्रिल जगभर ज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. बाबासाहेबांचा शिक्षणाचा विचार प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यासाठी प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने देशातील पहिला सायन्स आणि आयटी पार्क पुण्यात उभारण्याची तयारी सुरु झाली आहे. यासाठी एका तरुण अभ्यासकाने पुढाकार घेतला असून, याबाबत सरकारी पातळीवर निर्णय होण्यासाठी माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्याशी चर्चा करून पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे.
संशोधन, आयटी, माध्यम क्षेत्रात गेल्या पंधरा वर्षांपासून असलेल्या सुजित ठमके यांनी याबाबतचा प्रस्ताव तयार केला आहे. सामाजिक न्याय मंत्रालय, माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाला याबाबतचा प्रस्ताव पाठवला आहे.त्याचप्रमाणे पहिल्या पाच वर्षांसाठी १५०० कोटी रुपयांचा निधी यासाठी लागणार असून, त्यानंतर दरवर्षी शंभर कोटींची तरतूद करावी लागणार आहे.या पार्कच्या माध्यमातून दरवर्षी हजारो रोजगार उपलब्ध होणार असून, प्रशिक्षित कौशल्यपूर्ण मनुष्यबळ देखील या पार्कमधून तयार होईल. आयटी बेसप्रशिक्षण, संशोधन यासबंधीचे मार्गदर्शन केले जाईल, असा नाविण्यपूर्ण प्रकल्प सरकारकडे मांडण्यात आला आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर सायन्स आणि आयटी पार्क असावे. ज्यातून रोजगार निर्मिती होईल आणि वाढत्या बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल, अशी कल्पना गेल्या चार-पाच वर्षांपासून मनात होती. त्यासंबंधाने विविध क्षेत्रातील तज्ज्ञांसोबत चर्चा सुरु होती. त्यातून या प्रकल्पाचा एक आराखडा तयार केला आहे. - सुजित ठमके, प्रकल्प निर्माते