नाशिक बाजार समितीचे कार्यालय सील
By Admin | Published: October 27, 2016 01:07 AM2016-10-27T01:07:45+5:302016-10-27T01:07:45+5:30
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील कर्मचाऱ्यांना वाटप करण्यात येणारे सानुग्रह अनुदान, बक्षीस वेतनाची रक्कम व महागाई भत्त्याची रक्कम जवळ बाळगल्याप्रकरणी
नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील कर्मचाऱ्यांना वाटप करण्यात येणारे सानुग्रह अनुदान, बक्षीस वेतनाची रक्कम व महागाई भत्त्याची रक्कम जवळ बाळगल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तिघा कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला असून, कार जप्त केली आहे़ कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य कार्यालय सील करण्यात आले आहे़
एसीबीने मंगळवारी स्विफ्ट डिझायर कारमधून ५७ लाख ७३ हजार ८०० रुपयांची रोकड जप्त केली होती. बाजार समिती कर्मचाऱ्यांना वाटप होणारी लाखो रुपयांची रक्कम कारमधून नेली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती़ एका गोणीत ही रक्कम भरलेली होती़ बाजार समितीचे कर्मचारी तथा एका संचालकांचा सचिव संशयित विजय सीताराम निकम, लेखापाल अरविंद हुकूमचंद जैन व लिपिक दिगंबर हिरामण चिखले यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील रोकड व कार जप्त केली आहे़ एसीबीने तत्काळ बाजार समितीचे प्रमुख्य कार्यालय सील करून पोलीस तैनात केले आहेत. (प्रतिनिधी)
संचालकांवर संशयाची सुई?
बाजार समितीच्या एका बड्या संचालकाच्या सांगण्यावरूनच ही रक्कम काढण्यात आल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. त्यामुळे उपरोक्त संचालकाची उचलबांगडी होऊन चौकशी होण्याची शक्यता आहे.