कोल्हापूर : अतिरिक्त साखरेचा प्रश्न गंभीर असून, साखरेचे दर सुधारण्यासाठी साठा कमी झाला पाहिजे. यासाठी केंद्र सरकारने बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका या शेजारी देशांना उधारीवर साखर विकण्याचे धोरण आखल्याची माहिती राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.पटेल म्हणाले, पाऊस चांगला झाल्याने, मराठवाडा, विदर्भ, खानदेशातही उसाचे उत्पादन वाढल्याने अतिरिक्त साखरेचा प्रश्न निर्माण झाला.साठा कमी करण्यासाठी शेजारील देशांना उधारीवर साखर विक्री करायची त्याशिवाय ब्राझीलप्रमाणे उसापासून थेट इथेनॉल निर्मितीला प्राधान्य देण्यात येणार आहे.उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा शेतकऱ्यांच्या पदरात कसा पडेल, याची काळजी केंद्र सरकार घेत आहे. एका रात्रीत याचे परिणाम दिसणार नाहीत.उत्पादन खर्चावर दर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंत्रणा उभी केली असून सचिव दर्जाचे डॉ. अशोक दलवई यांची नेमणूक केली आहे. त्यांनी हजार पानाचा अहवाल तयार आहे. त्यामुळे उत्पादनखर्च अधिक ५० टक्के नफा शेतकºयांना मिळणार आहे, असेही त्यांनी सांगितले.दुहेरी साखर दराबाबत गांभीर्याने विचारउद्योगासाठी व खाण्यासाठी असे साखरेचे दोन दर केल्याशिवाय हा प्रश्न कायमचा संपणार नाही, या दिशेने केंद्राचे पाऊल पडत असल्याचे समाधान असल्याचे पटेल यांनी सांगितले.राजू शेट्टींनी संयम ठेवायला हवाशेतकरी चळवळीच्या माध्यमातून आम्ही यापूर्वी प्रश्न तयार करत होतो. सत्तेत आल्यानंतर प्रश्नांचे कायद्यात रूपांतर करण्यास शिकले पाहिजे. जे प्रेमाने मिळते, त्यासाठी संघर्ष कशाला करायचा, कृषिमूल्य आयोगाच्या माध्यमातून आपण शिफारसी केल्यामुळे २२ अध्यादेश केंद्र सरकारने काढले. राजू शेट्टी तर खासदार होते, त्यांनी थेट नरेंद्र मोदी यांच्या कानात सांगितले असते, तरी त्यांनी ते ऐकले असते. त्यांनी संयम ठेवायला हवा होता, असेही पटेल यांनी सांगितले.
शेजारील देशांना उधारीवर साखर विक्री - पाशा पटेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2018 4:59 AM