Coronavirus : 'कोरोना'वरून राजकारण करणाऱ्यांना Quarantine केलं पाहिजे, संजय राऊतांचा टोला!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 06:31 PM2020-03-20T18:31:18+5:302020-03-20T18:35:15+5:30
Coronavirus : 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने या कोरोनाशी युद्ध लढतात. सगळ्यांना सोबत घेऊन हे देशामध्ये कधी घडताना दिसले नाही.'
मुंबई : कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी राज्य सरकारकडून सर्व स्तरावर उपाययोजना करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोनावरून राजकारण करणाऱ्यांना क्वारंटाईन केलं पाहिजे, असे सांगत विरोधकांना टोला लगावला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या आयटीची सेलकडून 'देवेंद्रजी तुम्हीच मुख्यमंत्री व्हा', 'अशा संकटकाळी तुम्हीच मुख्यमंत्री पाहिजे', असे ट्रोलिंग, ट्रेंड सुरु आहे. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, "संकटाच्या काळात विरोधी पक्षाने सरकारच्या खांद्याला खांदा लागून काम केलं पाहिजे. एवढा शहाणपणा आमच्या विरोधीपक्षाकडे नसेल तर त्यांना राजकारणामध्ये विशेषता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काम करण्याचा अधिकार नाही. आज महाराष्ट्राने एक संग राहून, राजकीय मतभेद विसरून काम करण्याची गरज आहे."
याचबरोबर, "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने या कोरोनाशी युद्ध लढतात. सगळ्यांना सोबत घेऊन हे देशामध्ये कधी घडताना दिसले नाही. आम्ही स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व मान्य करतो. या लढाईमध्ये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा कोरोनाविषयीची लढाई सुरु केली आहे. अख्खा देश त्यांच्या पाठिशी आहे. आम्ही असे म्हणत नाही आहे, या राज्यातल्या भाजपाप्रमाणे", असे सांगत भाजपावर निशाणा साधला.
याशिवाय, "आज नरेंद्रांची गरज नसून अमूक अमूक यांची आहे. देशाला नरेंद्रांचीच गरज आहे. कारण आम्ही देश म्हणून एक आहोत संकटाच्या काळात. मला असे वाटत, जे काही महाराष्ट्रातील लोक आहेत, करतायेत नसते उद्योग, त्यांना नरेंद्र मोदी यांनी एखादे शिबिर लावून विरोधी पक्षाने संकटकाळत कसे काम करावे, याचे चिंतन त्यांना दिले पाहिजे. सध्या त्यांना क्वारंटाईन करायला पाहिजे, त्यांना क्वारंटाईनची गरज आहे, अशा शब्दांत संजय राऊत यांनी विरोधकांवर टीका केली.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमाद्वारे शुक्रवारी जनतेशी संवाद साधला. यावेळी 'कोरोनाच्याविरोधात जागतिक युद्ध सुरू असून संपूर्ण जगाला घरात थांबण्याची वेळ आली आहे. पुढचे 15 दिवस काळजी घेण्याची गरज आहे' असं मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. तसेच जीवनावश्यक सेवा वगळता सर्व कार्यालये 31 मार्चपर्यंत बंद करण्यात आली आहेत. खास करून मुंबई, पुणे-पिंपरी चिंचवड, नागपूर या मोठ्या शहरांत सर्व कार्यालये, दुकाने बंद होतील. राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांची उपस्थितील 25 टक्क्यांवर आणली आहे. यापूर्वी ती 50 टक्क्यांवर आणली असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.