ज्येष्ठ नागरिकांना निवडणुकीचे काम, सेवानिवृत्तांना संधी; अनोखा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 02:44 AM2018-01-15T02:44:50+5:302018-01-15T02:44:54+5:30
खासगी धर्मादाय संस्था, वाचनालय किंवा पतसंस्था असो, त्यांच्या निवडणुका संचलित करण्यासाठी लागणारा अनुभवी वर्ग म्हणून शासकीय सेवानिवृत्त कर्मचाºयांचा येथे चांगला उपयोग करून घेतला जात आहे
संजय पाठक
नाशिक : खासगी धर्मादाय संस्था, वाचनालय किंवा पतसंस्था असो, त्यांच्या निवडणुका संचलित करण्यासाठी लागणारा अनुभवी वर्ग म्हणून शासकीय सेवानिवृत्त कर्मचाºयांचा येथे चांगला उपयोग करून घेतला जात आहे. नाशिक पॅटर्न म्हणून तो पुढे येत आहे. चार पैसे मिळण्याबरोबरच निवृत्तीनंतरही समाजाप्रति आपली उपयुक्तता टिकून असल्याचे वेगळे समाधानही त्यांना मिळते.
विविध संस्था-संघटनांच्या सहकार खात्यानुसार निवडणुका होतात. धर्मादाय आयुक्तांच्या अखत्यारीतील संस्थांनाही निवडणुका घेणे बंधनकारक असते. त्यामुळे उपरोक्त सर्वांना निवडणूक अधिकारी व मतमोजणी कर्मचाºयांची गरज असते. सेवानिवृत्त सरकारी कर्मचाºयांचे ज्येष्ठ नेते माधवराव भणगे हे त्यासाठी येथे हक्काचे नाव आहे. केंद्र सरकारी प्रेस कामगारांचा मजदूर संघ, नाशिक सार्वजनिक वाचनालय, नाशिक एज्युकेशन सोसायटी आदी मोठ्या संस्था, संघटनांना भणगे हे सेवानिवृत्तांची माहिती कळवतात. निवडणुकीसाठी काम करण्याची तयारी असल्याची संमती घेतली जाते.
शासकीय-निमशासकीय ज्येष्ठांना निवडणूक प्रक्रियेचे प्रशिक्षण दिले जाते. लोकसभा-विधानसभा निवडणुकींप्रमाणेच मतमोजणी करून प्रमाणपत्र देण्यापर्यंतची सर्व कामे निवडणूक अधिकारी आणि त्यांचे पथक करतात. एक ते दीड हजार रुपये मानधन मिळते.
निवडणुकीचे काम करण्यासाठी सर्व प्रकारची तयारी आवश्यक असते. सेवानिवृत्त शासकीय कर्मचारीदेखील उत्साहाने त्यात सहभागी होतात. ताण-तणावाचे प्रसंग आले तरी अद्याप कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही.
- माधवराव भणगे, समन्वयक, सेवानिवृत्त कर्मचारी संघटना