ज्येष्ठ साहित्यिक ह.मो. मराठे यांचे निधन, साक्षेपी संपादक हरपला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 03:57 AM2017-10-03T03:57:29+5:302017-10-03T03:57:36+5:30
परखड विचार मांडत सडेतोड लेखणीमधून पत्रकारितेसह साहित्य विश्वात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण करणारे ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक हनुमंत मोरेश्वर उपाख्य ह. मो. मराठे यांचे सोमवारी पहाटे दीर्घ आजाराने निधन झाले
पुणे : परखड विचार मांडत सडेतोड लेखणीमधून पत्रकारितेसह साहित्य विश्वात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण करणारे ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक हनुमंत मोरेश्वर उपाख्य ह. मो. मराठे यांचे सोमवारी पहाटे दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. त्यांच्या मागे दोन मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे.
‘निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी’ या त्यांच्या साहित्यकृतीमुळे मराठी वाचकाला ह. मो. यांचा खºया अर्थाने परिचय झाला. ‘बालकांड व बालकांड आणि पोहरा’ या त्यांच्या आत्मचरित्रातून त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पदर उलगडले. त्यांची ‘काळेशार पाणी’ ही कादंबरी चांगलीच गाजली होती. कादंबरीमधील वादग्रस्त लेखनामुळे त्यांना कोर्टाची पायरी चढावी लागली. ‘साधना’ने ही कादंबरी प्रकाशित केली असल्यामुळे विश्वस्त एस. एम. जोशी यांनी १९७३ च्या सुमारास कादंबरीच्या बाजूने सर्वोच्च न्यायालयापर्यंत खटला लढवू, असे जाहीर केले होते. त्यानंतर महाराष्ट्रात ‘पुलोद’ सरकार आल्यानंतर ‘काळेशार पाणी’वरचा खटला मागे घेण्यात आला होता. आपल्या लेखनावर आणि विचारांवर ते कायमच ठाम राहिले, हेच त्यांच्या लेखन आणि व्यक्तिमत्वाचे आगळेवेगळे वैशिष्ट्य होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वास वादाचे पैलूही होते.
काही दिवसांपासून आजारी असल्यामुळे उपचारासाठी त्यांना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अत्यंसंस्कार करण्यात आले.
चिपळूणला झालेल्या ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संंमेलनाची निवडणूक ह.मो. मराठे यांनी लढविली होती. त्यावेळी जातीय तेढ पसरविणारे लेखन केल्याचा त्यांच्यावर आरोप झाला. वाद ओढवून घेतल्यामुळे त्यांना अटकही झाली होती. या गोष्टींमुळे अस्वस्थ होऊन त्यांनी संंमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली होती.
चतुरस्त्र लेखक
ह. मो. मराठे यांचा जन्म २ मार्च १९४० रोजी झाला. ‘हमो’ या टोपण नावाने ते ओळखले जात होते. त्यांच्या काही कथा कादंबºयांमधून उपरोधिक आणि विडंबनात्मक लेखनशैलीचा अनुभव त्यांनी वाचकांना दिला. ते चतुरस्त्र लेखक व साक्षेपी संपादक होते.
हमोंना त्यांच्या भावाने वयाच्या १०-१२ व्या वर्षी शाळेत घातले. एम. ए. पर्यंत त्यांनी शिक्षण पूर्ण केले आणि कोल्हापूरच्या महाविद्यालयात प्राध्यापकाची नोकरी करू लागले. पुढे लेखन, वाचन, संपादन आणि साहित्य निर्मितीच्या क्षेत्रात ते स्थिरावले. त्यांचे पहिले लेखन म्हणजे १९५६ साली ‘साप्ताहिक जनयुग’च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेली एक नाटिका. त्यांना खरी प्रसिद्धी मिळाली ती साधना साप्ताहिकाच्या १९६९ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी’ या कादंबरीने. ही कादंबरी पुढे १९७२ मध्ये पुस्तकरूपात आली. ती अनेक विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात आहे.
ह.मो मराठे यांची साहित्यसंपदा
प्रकाशित साहित्य
कथासंग्रह :
अण्णांची टोपी
इतिहासातील एक अज्ञात दिवस
ज्वालामुख
कादंबरी
निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी
काळेशार पाणी
उपरोधिक/ व्यंगात्मक
आजची नायिका
उलटा आरसा
चुनाव रामायण
द बिग बॉस
दिनमान
मुंबईचे उंदीर
माधुरीच्या दारातील घोडा
श्रीमंत श्यामची आई
वैचारिक
काळेशार पाणी :
संहिता आणि समीक्षा
आत्मचरित्र
बालकांड (आत्मकथेचा १ला भाग)
पोहरा (आत्मकथेचा २रा भाग)
वैचारिक
न लिहिलेले विषय
संपादन
बालकाण्ड
आणि पोहरा : समीक्षा आणि समांतर समीक्षा
लेखसंग्रह
मधलं
पान
बाल साहित्य
वीज
ते मराठीतील श्रेष्ठ कादंबरीकार होते. कादंबºयांमध्ये त्यांनी आधुनिक जीवनाचे अनेकविध पैलू मांडले. वेगवेगळ्या नियतकालिकांचे संपादक म्हणून त्यांनी केलेले कार्य मोलाचे होते.
- डॉ. नागनाथ कोतापल्ले,
ज्येष्ठ साहित्यिक
मराठे यांचे निधन एकूण साहित्य संस्कृतीसाठी दु:खाचे पर्व आहे. मराठे यांचे कथा वाङ्मय मानवी जीवनाच्या सखोल आकलनातून निर्माण झाले. मराठी पत्रकारितेत मोजके संपादक श्रेष्ठ दर्जाचे साहित्यिक आहेत. त्यापैकी मराठे होते.
- डॉ. श्रीपाल सबनीस, माजी संमेलनाध्यक्ष
‘निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी’ या त्यांच्या लेखनकृतीने मराठीला ते वेगळ्या धर्तीचे लेखक म्हणून कायम स्मरणात राहतील. माझ्या पिढीचे ते आवडते लेखक आणि माझे ज्येष्ठ स्नेही होते.
- डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ.
लेखक म्हणून जे काम त्यांनी केले आहे ते खूप अस्वस्थ करणारे आहे. मराठीमध्ये त्यांनी अनेक प्रयोग केले. विशिष्ट विषयांकडे पाहाण्याची त्यांंची दृष्टी अत्यंत संवेदनशील होती. अस्वस्थ करीत राहाणार असचं काहीतरी करीत राहाणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
- क्षीतिज पटवर्धन, दिग्दर्शक, लेखक
ह.मोंचा आणि माझा संबंध ते किर्लोस्कर मासिकांचे संपादक असताना आला. त्यांनी विविध वृत्तपत्रांमध्ये लिखाण केले. त्यांच्याकडून मला नेहमीच प्रोत्साहन मिळाले. हमोंची साहित्यिक पातळी फार मोठी होती. ते एक साक्षेपी संपादक होते.
- शिवराज गोर्ले, ज्येष्ठ लेखक
आधुनिकीकरण, तंत्रज्ञानाचा मानवी जीवनात झालेला शिरकाव तसेच व्यवस्थापनातल्या नव्या प्रणालीतून निर्माण झालेल्या शोषणाच्या नव्या व्यवस्था यात होणारी माणसांची घुसमट आणि त्यांचा अस्तित्वासाठीचा संघर्ष या साºयांचा वेध हमोंनी आपल्या साहित्यकृतीतून घेतला. लेखनाला सर्वस्व मानणारा मनस्वी लेखक हमोंच्या निधनामुळे मराठी साहित्यविश्वाने गमावला आहे.
- प्रा.मिलिंद जोशी, कार्याध्यक्ष महाराष्ट्र साहित्य परिषद
मराठे यांच्या निधनाने मराठी साहित्यातील शैलीदार, विचारप्रधान कथाकार हरपला आहे. मराठे यांनी बालकांड या आपल्या आत्मचरित्रात तटस्थपणे आपली भूमिका मांडली. साहित्य संमेलन अध्यक्षपद त्यांना मिळायला हवे होते, ते संमेलनाचे अध्यक्ष झाले नाहीत तरीही ते त्या योग्यतेचे होते. त्यामुळे मी त्यांना अनभिषिक्त अध्यक्ष म्हणतो.
-डॉ.न.म.जोशी (ज्येष्ठ साहित्यिक शिक्षणतज्ज्ञ)