केंद्र शासनाने तात्काळ कर्नाटक राज्य केंद्रशासित वा बरखास्त करावे: नीलम गो-हे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2017 06:11 PM2017-07-28T18:11:40+5:302017-07-28T18:17:07+5:30
कर्नाटकमध्ये काही दिवसांपूर्वी स्वतंत्र झेंड्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीवर शिवसेनेच्या आमदार नीलम गो-हे यांनी जोरदार टीका केली आहे.
मुंबई, दि. 28 - कर्नाटकमध्ये काही दिवसांपूर्वी स्वतंत्र झेंड्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीवर शिवसेनेच्या आमदार नीलम गो-हे यांनी जोरदार टीका केली आहे. स्वतंत्र झेंड्याची मागणी म्हणजे कर्नाटकच्या कॉग्रेसी राज्यकर्ताची दळभद्री कल्पना असल्याचं त्या विधानपरिषदेत म्हणाल्या. तसंच केंद्र शासनाने तात्काळ कर्नाटक राज्य केंद्रशासित करावे वा बरखास्त करावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली. या विषारी प्रवृत्तीचा निषेध करुन केंद्र शासनाने तात्काळ कर्नाटक राज्य केंद्रशासित करावे अथवा बरखास्त करावे असा ठराव या विधान परिषदेत व विधानसभेत एकमताने मंजूर करावा असं त्या म्हणाल्या.
देशात भाषावाद राज्य रचना या मागे भौगोलिक व सांस्कृतिक जोपासनेतून त्या त्या राज्यांची अस्मिता शाबूत रहावी व सर्व दृष्टीने विकास व्हावा ही भावना होती. राज्याला स्वतंत्र झेंड्याची मागणी म्हणजे या भावनेतून निर्माण झालेल्या राज्यातून सार्वभोम या भारताच्या एकात्मतेला तडा जाईल अशी मागणी आहे. कर्नाटक सरकारने त्या राज्याचा वेगळा स्वतंत्र झेंडा असावा अशी मागणी करणे हा कर्नाटकच्या कॉग्रेसी राज्यकर्त्यांची ही दळभद्री कल्पना आहे. ही मागणी म्हणजे देशाच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणारी आहे. देशाच्या स्वातंत्रासाठी ज्या स्वातंत्र्यवीरांनी ब्रिटींशांविरुध्द लढा देवून हौतात्म्य पत्करले आणि देशाच्या स्वातंत्र्याच्या निर्मितीनंतर या देशाचा तिरंगा फडकवू लागला त्या देशातील स्वातंत्रवीरांच्या आणि तिरंग्याचा अवमान आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी व देश सुरक्षित रहावा यासाठी सीमेवर लढणा-या जवानांचाही हा अपमान आहे. अशी मागणी म्हणजे दक्षिणेकडील राज्यांत राष्ट्रीय भावनेचा -हास होत असल्याचा पुरावा आहे. महाराष्ट्र राज्य हे नुसते पुरोगामी राज्य नसून देशाच्या स्वातंत्र्यासाठी या राज्यातील अनेक स्वातंत्र्यवीरांनी हौतात्म्य पत्करलेले आहे, असं गो-हे म्हणाल्या.
ज्यावेळी देशाच्या संरक्षणासाठी हिमालयाने सहयाद्रीला हाक दिली, त्यावेळी हा महाराष्ट्र सर्वस्वाचा त्याग करुन देशाच्या सुरक्षिततेसाठी खंबीरपणे उभा राहीला हा इतिहास आहे. देशाच्या तिरंग्याला दुय्यम समजण्यापलिकडे कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांची मजल जावी ही विषारी प्रव्रुत्ती आहे. या विषारी प्रवृत्तीचा निषेध करुन केंद्र शासनाने तात्काळ कर्नाटक राज्य केंद्रशासित करावे अथवा बरखास्त करावे असा ठराव या विधान परिषदेत व विधानसभेत एकमताने मंजूर करावा. महाराष्ट्र हा देशाच्या सार्वभौमत्वाला कदापी तडा जाऊ देणार नाही याची हमी दयावी, अशी मागणी निलम गो-हे यांनी केली.