राज्य विधिमंडळाचे अधिवेशन पुढे ढकलले, आता 7 सप्टेंबरपासून सुरू होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2020 05:20 PM2020-07-28T17:20:15+5:302020-07-28T18:01:17+5:30
येत्या ३ ऑगस्टपासून सुरू होणार्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलले गेले आहे.
मुंबईः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशन पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आले असून, आता अधिवेशन 07 सप्टेंबर 2020 रोजी बोलाविण्यात येईल, असा निर्णय आज विधान भवन मुंबई येथे झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. गेल्या काही दिवसांपूर्वी राजभवनमधील २४ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. त्याच पार्श्वभूमीवर महापालिकेनं तातडीनं उपाययोजना राबवल्या आहेत. येत्या ३ ऑगस्टपासून सुरू होणार्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलले गेले आहे. तत्पूर्वी विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जून रोजी होणार होते. मात्र कोरोनामुळे ते पुढे ढकलून ३ ऑगस्ट रोजी घेण्याचे ठरले होते.
राज्याच्या विधानसभेत २८८ सदस्य असून कामकाज चालवण्यासाठी २९ आमदारांच्या कोरमची गरज असते. त्यामुळे सत्ताधारी आणि भाजपा पक्षाचे मिळून फक्त ३० आमदार बोलावून त्यात कामकाज करण्याचा पर्यायाचाही विचार होऊ शकतो. कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असताना ३ ऑगस्ट रोजीही अधिवेशन घेणे सरकारला योग्य वाटले नाही. अधिवेशन घेतले तर मंत्री, आमदार, अधिकारी, कर्मचारी यामुळे होणारी गर्दी लक्षात घेता कोरोनाचा प्रादुर्भाव त्यातून वाढण्याची भीती आहे.
या सर्व बाबींवर उद्याच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशन ७ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. ३ ऑगस्टपासून हे अधिवेशन घ्यायला सरकारही तयार नव्हते. आधीच सरकारमधील काही मंत्री, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झालेली आहे. त्यात अधिवेशन घेऊन सरकार धोका पत्करू इच्छित नसल्याचंही सांगितलं जात आहे.