मुंबई : विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्यावरील अविश्वास ठराव मांडू दिला जात नसल्याच्या विरोधात विरोधी पक्ष सदस्यांनी सोमवारी सभागृहात केलेल्या गदारोळामुळे कामकाज तीन वेळा तहकूब करण्यात आले. शेवटी अध्यक्षांच्या दालनात बैठक होऊन तोडगा निघाला आणि कामकाज सुरळीत झाले.कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी अविश्वास प्रस्ताव मांडू देण्याची मागणी केली. विरोधकांचा अविश्वासाचा ठराव दिलेला असताना तो चर्चेला न आणता मुख्यमंत्र्यांनी गेल्या शुक्रवारी अध्यक्षांवरील विश्वास प्रस्ताव मांडला व आवाजी मतदानाने तो मंजूरही करण्यात आला होता. त्यावर संतप्त विरोधी सदस्यांनी सभागृह संपूनही तेथेच ठाण मांडले आणि सायंकाळी राज्यपालांची भेट घेतली होती.विखे पाटील आज सभागृहात म्हणाले की, अविश्वास ठराव आणण्याचा विरोधकांचा घटनात्मक अधिकार हिरावून घेणे हा अन्याय आहे. माजी विधानसभाध्यक्ष राष्ट्रवादीचे जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही अविश्वास प्रस्ताव मांडू देण्याची जोरदार मागणी केली. अध्यक्षांनी त्यास अनुमती देऊन सभागृहाची आणि अध्यक्षपदाचीही गरिमा राखावी, असे सांगून वळसे पाटील म्हणाले की, विलासराव देशमुख यांच्या सरकारवर तेव्हाच्या विरोधी पक्षाने अविश्वास आणला तेव्हा त्याच्या आधीच विलासरावांनी विश्वास ठराव मंजूर करवून घेतला होता. तो त्यांच्या सरकारविरुद्धचा प्रस्ताव होता पण इथे अध्यक्षांविरुद्ध प्रस्ताव आलेला असताना त्यांच्या बचावासाठी मुख्यमंत्र्यांनी विश्वासदर्शक ठराव आणणे योग्य नव्हते. ‘विरोधकांना अविश्वास ठराव मांडू द्यावा, चर्चेने तो मागेही घेता येईल, असे संकेत विरोधी पक्षाच्या ज्येष्ठ सदस्यांनी दिले.मुख्यमंत्री यावर म्हणाले की, विलासरावांनी जो ठराव मांडण्यापूर्वी अध्यक्षांना नोटीस दिलेली नव्हती. आम्ही तर नोटीस देऊन नियमाप्रमाणे ठराव मांडला. विलासरावांनी मांडलेल्या ठरावाचे तत्व अध्यक्षांवरील विश्वासदर्शक ठरावाबाबतही लागू होते.अविश्वास प्रस्तावाच्या मुद्यावरून विरोधकांनी वेलमध्ये उतरुन घोषणाबाजी केली. गदारोळात कामकाज तीनवेळा तहकूब करण्यात आले. दरम्यान, अध्यक्षांच्या दालनात सर्व गटनेत्यांची बैठक होऊन तोडगा निघाला आणि कामकाज सुरळीत झाले. उद्या विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव कामकाजात घेतला जाईल. त्यावर काही सदस्यांना बोलू दिले जाईल आणि नंतर तो मागे घेतला जाईल, अशी शक्यता आहे.
गदारोळानंतर निघाला तोडगा, अविश्वासावर आज पडदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 4:43 AM