वाशिम : पूजा चव्हाण प्रकरणी काही दिवस अज्ञातवासात गेलेले वनमंत्री संजय राठोड यांनी दोन दिवसांपूर्वी वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे मोठे शक्तीप्रदर्शन करीत मोठ्या प्रमाणात समर्थक जमा केले होते. तसेच पोहरादेवी मंदिराला भेट देऊन सपत्निक दर्शन घेतले होते. त्याच पोहरादेवी मंदिरातील महंत कबिरदास महाराज उपाख्य कबीर राठोड व त्यांच्या कुटुंबातील चार जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पोहरादेवीत एकूण सात जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
पोहरादेवी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या गावात एकूण ११ व्यक्ति कोरोनाबाधित आल्या. ही चाचणी २३ फेब्रुवारी रोजी केली होती. २५ फेब्रुवारी रोजी चाचणीचा अहवाल प्राप्त झाला असून, यामध्ये कबिरदास महाराज (कबीर राठोड) व त्यांच्या कुटुंबातील चार सदस्यांचा समावेश आहे. आणखी काही नागरिकांच्या कोरोना चाचण्या केल्या जात आहेत, अशी माहिती पोहरादेवी प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध जाधव यांनी दिली.
कबिरदास महाराजांनी २१ तारखेला कोरोनाची टेस्ट केली होती. मात्र तरीही ते संजय राठोड पोहरादेवी येथे आले तेव्हा दिवसभर त्यांच्यासोबत होते. कबिरदास महाराज पोहरादेवी मंदिर आणि सेवालाल महाराज ट्रस्टचे अध्यक्ष आहे. संजय राठोड यांनी २३ फेब्रुवारी रोजी प्रथम महंत कबिरदास महाराज यांची भेट घेतली होती. त्यादिवशी विविध ठिकाणहून हजारो जण पोहरादेवीत उपस्थित होते. मात्र आता या गर्दीतून कोरोनाचा संसर्ग झाला असल्यास संक्रमणाची मोठी भीती व्यक्त केली जात आहे.