विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यातील ७ हजार ५७६ ग्राम पंचायतींची निवडणूक ७ आणि १४ आॅक्टोबर रोजी होणार आहे. पहिल्यांदाच सरपंचाची निवडणूक थेट जनतेतून होईल.राज्य निवडणूक आयुक्त जे.एस.सहारिया यांनी पत्रपरिषदेत ही घोषणा केली. ते म्हणाले की, थेट सरपंचपदासाठी पहिल्यांदाच मतदान होत असल्याने आचारसंहितेबाबत विशेष दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एका मतदाराला कमीत कमी तीन व जास्तीत जास्त चार मते द्यावी लागतील. एक मत थेट सरपंचपदासाठी असेल; तर अन्य मते आपल्या प्रभागातील सदस्यपदांसाठी द्यावी लागतील.आचारसंहिता लागूनिवडणूक जाहीर झालेल्या सर्व ग्राम पंचायतींच्या क्षेत्रात आजपासूनच निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे. ज्या जिल्ह्यांत एकूण ग्रामपंचायतींपैकी ५० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त ग्रामपंचायतींच्या निवडणुका असल्यास अशा जिल्ह्याच्या संपूर्ण ग्रामीण क्षेत्रात आचारसंहिता लागू असेल. ज्या तालुक्यात ५० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुका असल्यास अशा तालुक्याच्या संपूर्ण ग्रामीण क्षेत्रात आचारसंहिता लागू राहील. परंतु, निवडणूक नसलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विकास कामांवर कोणतेही निर्बंध राहणार नाहील असे सहारिया यांनी स्पष्ट केले.७ आॅक्टोबर रोजी मतदान होत असलेल्या जिल्हानिहाय ग्राम पंचायती अशा : नाशिक १७०, धुळे १०८, जळगाव १३८, नंदुरबार ५१, अहमदनगर २०४, औरंगाबाद २१२, बीड ७०३, नांदेड १७१, परभणी १२६, उस्मानाबाद- १६५, जालना- २४०, लातूर- ३५३, हिंगोली- ४९,अमरावती- २६२, अकोला- २७२, यवतमाळ- ९३, वाशीम- २८७ आणि बुलडाणा- २८०. एकूण- ३८८४.१४ आॅक्टोबर रोजी मतदान होत असलेल्या ग्राम पंचायती : ठाणे ४१, पालघर ५६, रायगड २४२, रत्नागिरी २२२, सिंधुदुर्ग ३२५, पुणे २२१, सोलापूर १९२, सातारा ३१९, सांगली- ४५३, कोल्हापूर- ४७८, नागपूर- २३८, वर्धा- ११२, चंद्रपूर- ५२, भंडारा- ३६२,गोंदिया- ३५३ आणि गडचिरोली- २६. एकूण- ३६९२.
साडेसात हजार ग्रामपंचायतींची आॅक्टोबरमध्ये निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2017 5:49 AM