सतरा भिक्षेकरूंची बँकेत खाती
By admin | Published: April 3, 2015 10:40 PM2015-04-03T22:40:27+5:302015-04-04T00:02:41+5:30
अश्विन मुदगल यांच्या पुढाकाराला यश
सातारा : येथील पुरुष भिक्षेकरी गृहातील सतरा भिक्षेकऱ्यांना प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत खाती उघडून देण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या हस्ते एटीएम कार्डचे वितरण करण्यात आले. यावेळी पुरुष भिक्षेकरी गृहाचे अधीक्षक शिवाजी खुडे, बँक आॅफ महाराष्ट्रचे सातारा विभागाचे झोनल मॅनेजर अहिलाजी थोरात, बँकेच्या आर्थिक साक्षरता केंद्राचे प्रमुख नीतिराज साबळे, श्रीराम नानल, किरण गाडे, सुषमा बनकर उपस्थित होते. जिल्हाधिकारी मुदगल म्हणाले, ‘भिक्षेकऱ्यांची केवळ खाती उघडणे पुरेसे नसून तर त्यांना आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. भिक्षेकऱ्यांनी आपल्यामध्ये काही कमतरता आहे, असे समजू नये. आपल्यातील आत्मविश्वास जागविण्यासाठी आपल्या क्षमता, कला यांचा विकास करून उपयोगी व्यवसायाद्वारे चांगल्या तऱ्हेचे जीवन जगण्यासाठी त्यांचा उपयोग केला पाहिजे. भिक्षेकऱ्यांनी जीवनातील ध्येय निश्चित करून कष्ट करून आपल्यामध्ये कमी असलेल्या आत्मसन्मानात वाढ करण्यासाठी प्रयत्न करावेत. प्रशासनामार्फत त्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल.’ अहिलाजी थोरात म्हणाले, ‘जिल्ह्यात ७४० गावांमध्ये महाराष्ट्र बँकेद्वारे आर्थिक सेवा पुरविली जाते. दुर्गम भागात २०९ बँक मित्र घरपोच सेवा देत आहेत. जनधन योजनेअंतर्गत ६५ हजार खाती उघडली आहेत.’ अधीक्षक खुडे म्हणाले, ‘भिक्षेकऱ्यांना बचतीची सवय लावण्यासाठी ही योजना राबविण्यास महाराष्ट्र बँकेने प्रतिसाद दिला. चांगल्या प्रकारचे जीवन जगण्यासाठी या खात्यांचा निश्चित उपयोग होईल. भिक्षेकरी गृहाची पाण्याची समस्या सोडविण्यासाठी कूपनलिका, भोजन हॉल बांधून मिळावा.’ यावेळी सतरा भिक्षेकऱ्यांना कार्ड व आर्थिक दैनंदिनी पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. नीतिराज साबळे यांच्यासह बँक मित्र किरण गाडे, सुषमा बनकर यांचा सत्कार केला. (प्रतिनिधी) पहिलाच उपक्रम ‘आर्थिक, सामाजिक, मानसिक कारणांमुळे भिक्षेकरी गृहात दाखल व्हावे लागलेल्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी येथील पुरुष भिक्षेकरी गृहातील सदस्यांची प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत खाती उघडण्याचा महाराष्ट्र बँकेचा राज्यात पहिलाच असा उपक्रम आहे. त्यामुळे भिक्षेकऱ्यांच्या आत्मसन्मानात वाढ होईल,’ असे गौरवोद्गार जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी काढले.