काकांचा निवडून आणण्यात तर पुतण्याचा पाडण्यात हातखंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2019 04:39 PM2019-10-24T16:39:09+5:302019-10-24T16:39:09+5:30
पवारांनी सातारा लोकसभा पोट निवडणुकीत आपले मित्र श्रीनिवास पाटील यांना बलाढ्य उदयनराजे यांच्याविरुद्ध निवडून आणण्याची किमया केली. त्यामुळे पवार काका-पुतण्याची निवडून आणण्याची आणि पाडण्याची कला पुन्हा एकदा महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरली आहे.
मुंबई - महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवारांनी दिलेला शब्द अनेक ठिकाणी प्रमाण मानला जातो. त्यामुळे त्यांना 'एकच वादा अजित दादा' असं त्यांचे समर्थक संबोधतात. तेच पुन्हा एकदा सिद्ध होताना दिसत आहे. एका सभेत अजित पवार यांनी पाठबंधारे मंत्री विजय शिवतारे कसे निवडून येतो तेच बघतो, असं म्हटलं होतं. अगदी तसच होताना दिसत आहे. शिवसेना उमेदवार शिवतारे यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार कोणालाही निवडून आणू शकतात, तर अजित पवार कोणत्याही उमेदवाराला पाडण्याचे क्षमता ठेवतात, असं मिथक महाराष्ट्राच्या राजकारणात आहे. या काका-पुतण्याच्या राजकारणाचा फंडाच काही वेगळा आहे. आपल्या सडेतोड बोलण्यामुळे अजित पवार अनेकदा वादात अडकतात. परंतु, त्यांनी आपली लकब कधीही बदलली नाही.
काय पोपटासारखा मिटू मिटू बोलायला लागलाय, अरे विजय शिवतारे तुझं बोलणं किती..?तुझा आवाज किती..? तू बोलतोय कुणा बरोबर, तुला यंदा दाखवतोच तू कसा आमदार होतो ते...अख्या महाराष्ट्राला माहितीय मी जर एखाद्याला ठरवलं आमदार नाही करायचं तर कुणाच्या बापाला ऐकत नाही.. आम्ही म्हणतो बाबा , जाऊ द्या जाऊ द्या, गप बसा, गप बसा, याच तर नुसतं उर भरून आलंय .. त्याला काय करू काय नाय ..तू आता २०१९ ला कसा आमदार होतोय तेच बघणार आहे, असं वक्तव्य अजित पवारांनी केलं होतं.
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाल्यापासूनच शिवतारे यांचं काय होणार असा प्रश्न मतदार संघात उपस्थित करण्यात येत होता. आता निकाल समोर आला असून शिवतारे पराभूत झाले. काँग्रेसचे संजय जगताप यांना शिवतारे यांचा पराभव केला. दुसरीकडे पवारांनी सातारा लोकसभा पोट निवडणुकीत आपले मित्र श्रीनिवास पाटील यांना बलाढ्य उदयनराजे यांच्याविरुद्ध निवडून आणण्याची किमया केली. त्यामुळे पवार काका-पुतण्याची निवडून आणण्याची आणि पाडण्याची कला पुन्हा एकदा महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरली आहे.