Sharad Pawar, NCP meeting: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार मंथन आणि अभ्यास शिबीर आजपासून शिर्डीत सुरू झाले. ४ आणि ५ नोव्हेंबरला हे अभ्यास शिबीर आयोजित केले आले आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, आमदार अजित पवार आणि इतर मान्यवर बडे नेते राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आयोजिक 'राष्ट्रवादी मंथन, वेध भविष्याचा' या अभ्यास शिबिरात मार्गदर्शन करणार आहेत. या अभ्यास शिबिराला राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार देखील उपस्थित राहणार होते. पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल करण्यात आले. तरीदेखील तेथून त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून अभ्यास शिबीराला हजेरी लावली.
पक्षाची २३ वर्षाची वाटचाल व योगदान, पक्षाने राज्यात केलेले काम, देशाची व जगाची परिस्थिती यावर या मंथन अभ्यास शिबिरात दोन दिवस चर्चा होणार आहे. पक्षाच्यावतीने एक अॅप काढले आहे. या अॅपमध्ये पक्षाची सर्व माहिती, निर्णय पुढच्या पिढीला अवगत होणार आहे. या शिबीराला पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार असून मोकळी चर्चा केली जाणार आहे असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले होते. मात्र प्रकृतीच्या कारणास्तव शरद पवार यांना उपस्थित राहता आले नाही. मात्र कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शिबीरात सहभागी झाले आणि त्यांनी सर्वांशी संवाद साधला.
राष्ट्रवादी मंथन शिबीरात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपा आणि महाराष्ट्र सरकारवर जोरदार टीका केली. "आपल्या राष्ट्रवादी पक्षावर जेव्हा टिका होते याचा अर्थ आपला पक्ष बलशाली आहे. महाराष्ट्रात हाच पक्ष आपली सत्ता धोक्यात आणू शकतो ही भीती असल्याने सत्ताधार्यांकडून राष्ट्रवादीवर टीका होत आहे. राष्ट्रवादी पक्षाला २३ वर्ष झाली आहेत. शरद पवार या शिबिराला कालच येणार होते. मात्र ते उद्या येऊन मार्गदर्शन करतील," असे जयंत पाटील यांनी सांगितले होते. त्यानंतर आजच शरद पवारांनी VC द्वारे सहभागी झाले.