ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. १५ - सिनेजगतात ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांचे जे स्थान आहे, राजकारणात तेच स्थान शरद पवार यांचे आहे, अशा शब्दांत महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडेनी पवारांबद्दल कौतुकभरल्या शब्दांत आदर व्यक्त केला. तर पंकजा ही नव्या पिढीची दीपिका पडूकोण असल्याचे सांगत शरद पवार यांनीही तिला उत्स्फूर्त दाद दिली.
राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आज लातूरमध्ये अनावरण झाले. एरवी एकमेकांवर टीका करणारे राजकारणातील अनेक दिग्गज, शरद पवार, पंकजा मुंडे, अशोक चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील आदी महत्वाचे नेते विलासरावांसाठी यावेळी एकाच मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमातील भाषणा दरम्यान पंकजा मुंडे यांनी शरद पवारांबद्दल आदर व्यक्त केला. ' शरद पवार हे अतिशय ज्येष्ठ व अनुभवी नेते अाहेत. ज्याप्रमाणे दिलीप कुमार यांना सिनेसृष्टीत मानाचे स्थान आहे, त्याचप्रमाणे पवार यांचे राजकारणात स्थान आहे. त्यामुळे शरद पवार हे राजकारणातील दिलीपकुमारच आहेत' असे त्या म्हणाल्या.
त्यानंतर शरद पावर यांनीही पंकजा हिला आजच्या पिढीची दीपिका म्हणत तिचे कौतुक केले. ' पंकजाने माझी तुलना दिलीपकुमारशी केली मग तिची तुलना कोणाशी करावी असा प्रश्न मला पडला. आजकाल मी काही चित्रपट बघत नाही, त्यामुळे याबाबती मी अज्ञानी आहे. माझं अज्ञान लपवण्यासाठी मी रितेशला (देशमुख) सगळ्यात लोकप्रिय अभिनेत्रीबाबत विचारलं. त्याने माधुरी दिक्षितचं नाव घेतलं, पण मी म्हणालो की ती जुनी झाली. या काळातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री कोण असं त्याला विचारल्यावर त्याने दीपिका पडूकोण हिचं नाव सांगितल. म्हणून मी पंकजा हिला नव्या पिढीची दीपिका पडूकोण म्हणतो. त्यामुळे कार्यक्रमाला जुन्या पिढीचा दिलीपकुमार आणि नव्या पिढीची दीपिका दोघेही उपस्थित आहेत', असे पवारांनी म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.