मुंबई : राज्यात सध्या आरक्षण प्रश्नावरून रणकंदन सुरू आहे. मराठा समाजाकडून सरसकट कुणबी प्रमाणपत्रांची मागणी होत असल्याने राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष उभा राहिल्याचं चित्र आहे. या मुद्द्यावरून राजकीय वातावरणही तापलं असून भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर मराठा आरक्षणाचे सर्वात मोठे विरोधक असल्याचा आरोप केला होता. या आरोपाला आता राष्ट्रवादीच्या गोटातूनही जोरदार प्रत्युत्तर दिलं जात असून राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी फडणवीस यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे.
"मंडल आयोग लागू झाला तेव्हा मराठ्यांना शरद पवार यांमनी आरक्षण दिलं नाही असं आज फडणवीस म्हणत आहेत. पण मला त्यांना आठवण करून द्यायची आहे, की याच भाजपने मंडल आयोग लागू केला म्हणून व्ही.पी. सिंह सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता, सरकार पाडलं होतं. सरड्यालाही लाजवेल हे रंग बदलणं," अशा शब्दांत अनिल देशमुख यांनी भाजपविरोधात हल्लाबोल केला आहे. तसंच तुमच्यात धमक असेल तर सोडवा हा आरक्षणाचा प्रश्न. उगाच स्वत:च्या निष्क्रियतेचं खापर दुसऱ्यांवर फोडू नका, असंही देशमुख म्हणाले.
काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?
आगामी निवडणुकांच्या तयारीच्या दृष्टीने नुकतीच नागपुरात भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत आरक्षणावर भाष्य करताना देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर निशाणा साधला होता. "मराठा आरक्षणाचा इतिहास काढून बघितला तर सर्वात मोठा विरोध शरद पवार यांनीच केला आहे. त्यांना वारंवार संधी मिळाली. मनात आणलं असतं तर मंडल आयोग लागू झाला तेव्हाच शरद पवार यांनी मराठा आरक्षण दिलं असतं, पण त्यांनी दिलं नाही. शरद पवार यांना केवळ विविध समाजांना झुंजवत ठेवण्यातच जास्त रस आहे. लोक झुंजत राहिले तर नेतेपद राहील, ही त्यांची राजकारणाची पद्धत आहे," असा घणाघात फडणवीसांनी केला होता.
दरम्यान, मराठा आरक्षणावर राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात चर्चा झाल्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या विषयाबाबत सरकारतर्फे निवदेन सादर करण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्री मराठा आरक्षणाबाबत नेमकी काय भूमिका घेतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.