‘राष्ट्रवादी’च्या संघटनात्मक पुनर्रचनेचे सूतोवाच, वंचितकडे गेलेले मतदार जोडणार 'पवार'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2019 06:06 AM2019-11-04T06:06:11+5:302019-11-04T09:43:15+5:30
पराभवाबाबत उमेदवारांनी केलेल्या विश्लेषणावर पवार म्हणाले की
मुंबई : पक्ष म्हणून काही ठिकाणी आपण कमी पडलो. त्याची किंमत निवडणुकीत मोजावी लागली. त्याचा विचार केला पाहिजे. संघटनात्मक काम कमी पडले. काही जिल्ह्यांत वर्षानुवर्षे एकाच व्यक्तीकडे जबाबदारी आहे. तिथे नव्यांना संधी दिली पाहिजे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीतील संघटनात्मक बदलांचे सुतोवाच केले. मुंबई, ठाण्यासारख्या जिल्ह्यात एखाद दुसऱ्या जागीच राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी झाला. अशा ठिकाणी जास्त लक्ष देण्याची आवश्यकताही पवार यांनी बोलून दाखविली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात विधानसभेतील पराभूत उमेदवार आणि जिल्हाध्यक्षांची शरद पवार यांच्या उपस्थितीत रविवारी बैठक झाली. विधानसभेचा निकाल संमिश्र लागला. तरूणांनी आणि अल्पसंख्याक समाज विशेषत: मुस्लिमांनी आपली शक्ती राष्ट्रवादीच्या पाठीमागे उभी केली. काय वाटेल ते झाले तरी भाजप नको असे त्यांनी ठरवले होते. शिवाय शेतकऱ्यांनीही पाठिंबा दिला, असे सांगताना काही ठिकाणी मात्र आपण मागे पडलो, अशी स्पष्ट कबुलीही शरद पवार यांनी दिली. काही ठिकाणी आणखी काम करण्याची गरज आहे. हे
लोकांनी लक्षात आणून दिल्याचे, ते म्हणाले.
पराभवाबाबत उमेदवारांनी केलेल्या विश्लेषणावर पवार म्हणाले की, तुम्हाला यश आले नाही त्याची अनेक कारणे आहेत. दिल्लीत व राज्यात त्यांचे सरकार असल्यामुळे त्याचा पुरेपुर वापर सत्ताधाºयांनी केला. सहकारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काम केले नाही, ही बाब समजू शकतो. परंतु राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीच काम न केल्याच्या तक्रारी काहींनी केल्या. माझ्याच पक्षातील कार्यकर्ता काम करत नाही. विरोधी काम करतो, त्यावेळी मी स्वत:चे काम तपासून घ्यायला हवे, असा सल्लाही पवार यांनी यावेळी उपस्थितांना दिला.
पराभूत उमेदवारांकडे संबधित भागाची संघटनात्मक जबाबदारी सोपविली जाईल. त्यामाध्यमातून समाजातील विविध घटकांपर्यंत त्यांनी पोहचायला हवे. पक्ष म्हणून तुमच्या पाठीशी शक्ती उभी करणार आहे तुम्ही त्याचा वापर करून घ्या. महाराष्ट्रात तुम्हीच अग्रभागी आहे. हे लक्षात आणून देवू या, असे आवाहन त्यांनी केले.
वंचितच्या माध्यमातून दलित संघटन
च्वंचित बहुज आघाडीच्या माध्यमातून समाजातील गरीब वर्ग, दलित आणि मुस्लिम एकवटला. हा वर्ग लोकसभेत वंचितच्या पाठिशी राहिला. वंचितच्या पाठिशी असलेला मुस्लिम समाज विधानसभेत बाजुला झाला. तर नवबौद्ध आणि इतर वंचितच्यामागे उभा राहिला.
च्वंचितला पाठिंबा देणारा दलित, नवबौद्ध हा वर्ग आपल्या बाजुला आहे की नाही, हे पाहिले नाही. त्यामुळेच त्याचा फटका बसला आहे. एससी व एसटी या समाजाच्या ठिकाणी संघटनात्मक काम करण्यात कमी पडलो. त्यांना पक्षात प्रतिष्ठा देतो आहे की नाही हेही पाहिले पाहिजे, असे पवार म्हणाले.