ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १४ - बहुचर्चित शीना बोरा हत्याप्रकरणी सीबीआयाने अटक केलेल्या पीटर मुखर्जीच्या न्यायालयीन कोठडीत २८ डिसेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. शीना बोराच्या हत्येचा कट करणाऱ्या चार प्रमुख आरोपींपैकी एक पीटर मुखर्जी आहेत.
पीटर मुखर्जींना घरचे जेवण मिळावे यासाठी त्यांच्या वकिलांनी न्यायदंडाधिकाऱ्यांना विनंती केली आहे. पीटर मुखर्जींची प्रकृती तुरुंगातील जेवणामुळे खालावत आहे त्यामुळे त्यांना घरचे जेवण मिळावे अशी विनंती करण्यात आली आहे. त्यांच्या विनंतीवर सरकारी पक्षाने हरकत घेतली आहे. यावर उद्या (मंगळवारी) निर्णय देण्यात येणार आहे.
शीना बोराच्या हत्येमागे आर्थिक व्यवहार कारणीभूत असल्याचा दावा सीबीआयने केला. भारत आणि इंग्लंडमध्ये पीटर आणि इंद्राणीची मालमत्ता आहे. मात्र या मालमत्तेबाबत दोघांकडूनही पुरेशी माहिती मिळालेली नाही. तसेच शीनाच्या एचएसबीसी बॅंकेच्या खात्यात पैसे ठेवण्यात आल्याचा अंदाज असून याप्रकरणी एचएसबीसी बॅंकेच्या खात्यासंदर्भातील माहिती मिळविण्यासाठी इंटरपोलकडे मागणी केली आहे.
काय आहे प्रकरण? -
२४ एप्रिल २०१२ रोजी शीना बोराची गळा आवळून हत्या केल्याची कबुली इंद्राणीच्या ड्रायव्हरने दिली होती. गाडीमध्ये गळा आवळून शीनाची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर पेट्रोल टाकून तिचा मृतदेह रायगडजवळ जाळण्यात आला. शीनाची हत्या झाली, त्यावेळी इंद्राणी गाडीत असल्याची माहितीही ड्रायव्हरने दिली आहे. शीनाचा मृतदेह २३ मे २०१२ रोजी रायगडजवळ आढळून आला होता.
हत्येप्रकरणी आधी शीनाची आई इंद्राणीला अटक करण्यात आली होती. त्यानंतर इंद्राणीचा दुसरा पती संजीव खन्ना याला कोलकातामधून अटक झाली होती
अपहरण आणि कारमध्येच हत्या
वांद्र्याच्या नॅशनल कॉलेजबाहेरुन शीना बोराचं अपहरण करुन कारमध्येच गळा आवळून तिची हत्या केली. वाद मिटवण्यासाठी इंद्राणीने शीनाला मेसेज करुन वांद्र्याला बोलावलं होता, असं म्हटलं जात आहे.
पतीची फसवणूक
इंद्राणी मुखर्जीने पती पीटर मुखर्जी यांनाही अंधार ठेवल्याचं आता उघड झालं आहे. पहिलं लग्न लपवण्यासाठी, स्वत:च्या मुलीला बहिण सांगून, इंद्राणीने पती पीटर यांना अंधारात ठेवलं होतं.
इंद्राणीची मुलगी आणि पीटर मुखर्जींच्या मुलाचं प्रेमप्रकरण
या प्रकरणातील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे, इंद्राणीची मुलगी शीना आणि पीटर मुखर्जींच्या मुलाचं प्रेमप्रकरण होतं. म्हणजे इंद्राणी आणि पीटर या पती-पत्नींच्या मुलांचे आपापसात प्रेमसंबंध होते.
त्या माय-लेकीच
शीनाचा भाऊ मिखाईल बोरानेही शीना आणि इंद्राणी या माय-लेकीच असल्याचा दावा केला आहे.