ऊस उत्पादक शेतकरी शेट्टींच्या ‘शोधात’!
By admin | Published: December 12, 2014 10:47 PM2014-12-12T22:47:37+5:302014-12-12T23:34:25+5:30
हंगामास गती : यंदा दराबाबत साखर कारखानदारही गप्पच--‘आपण यांना पाहिलंत का?’
अशोक पाटील - इस्लामपूर -दरवर्षी गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी ऊस दराच्या आंदोलनात उतरणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यंदा हंगाम सुरू होऊन दोन महिने लोटले तरी गप्प आहेत. त्यातच साखरसम्राटांनीही शांत राहून गळीत हंगाम आटोपण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेट्टींच्या शोधात असून काही शेतकऱ्यांनी सोशल मीडियावर शेट्टींचे छायाचित्र पोस्ट करून, ‘आपण यांना पाहिलंत का?’ असा सवाल उपस्थित केला आहे.
जयसिंगपूर येथील ऊस परिषदेत राजू शेट्टी यांनी यावर्षी उसाला २७०० रुपये दर मागितला आहे. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील दोन साखर कारखान्यांनी २५०० रुपयांपर्यंत मजल मारली. साखरेचे भाव उतरले आहेत, असा कांगावा करत राज्यातील बहुतांश साखरसम्राटांनी दराबाबत मौन पाळून गळीत हंगाम संपविण्याचा मार्ग अवलंबला आहे.
एकीकडे शेट्टी लोकसभेत जाऊन समितीच्या धोरणावर मत मांडत असल्याचे सांगत आहेत, तर दुसरीकडे शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील ३५०० रुपयांसाठी आंदोलनाची भाषा करीत आहेत. शेट्टींचे सहकारी सदाभाऊ खोत यांनी, एफआरपीप्रमाणे दर न देणाऱ्या कारखान्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी करीत आंदोलनाची तयारी चालवली आहे. आघाडी सरकारच्या काळात शेट्टी यांनी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जिवावर मते मिळवत लोकसभेत दोनवेळा विजय मिळवला. गेल्या काही वर्षांत त्यांनी ऊसदराचे आंदोलन चांगलेच पेटवले होते. त्यामुळे एक-दोन महिने हंगाम लांबणीवर पडत होता. या आंदोलनाचा फटका शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांनाही बसला होता. पण यावर्षीच्या हंगामात मात्र पूर्ण उलटी परिस्थिती आहे. यावेळी भाजप-शिवसेनेचे सरकार राज्यात आहे. निवडणुकीवेळी शेट्टी यांनी त्यांच्यासोबत राहून निवडणूक लढवली होती. त्यामुळेच शेट्टी यांनी यावेळच्या ऊस दराबाबत एक शब्दही काढलेला नाही. राज्यातील सर्वच कारखान्यांनी गळीत हंगाम जोमात सुरू केला आहे, परंतु अद्याप बऱ्याच कारखान्यांनी दराचा निर्णय जाहीर केलेला नाही. काहींनी तर १४०० ते १५०० रुपये देऊन ऊस उत्पादकांची घोर निराशा केली आहे.
‘आपण यांना पाहिलंत का?’
शेतकऱ्यांच्या बाजूने संघर्ष करणारे राजू शेट्टी यावेळी मात्र अज्ञातवासात गेले आहेत. ऊस उत्पादक त्यांना शोधत आहेत. काही शेतकऱ्यांनी सोशल मीडियावर शेट्टी यांचे छायाचित्र पोस्ट करून, ‘आपण यांना पाहिलंत का?’ असा सवाल उपस्थित केला आहे. ऊसपट्ट्यात या पोस्टरची जोरदार चर्चा आहे.
शेतकऱ्यांच्या जिवावर मते मिळवत लोकसभेत दोनवेळा विजय मिळवला आहे. याच शेतकऱ्यांना त्यांनी का दूर सारले.