मुंबई : वांद्रे पश्चिमेचे आमदार आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या पाठिंब्याने गिरगाव चौपाटीवर प्रभू येशू जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. स्वत: शेलार यांनी नागरिकांना या महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केल्याने हिंदुत्ववादी संघटनांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. शिवाय, विकास सोडून काँग्रेसप्रमाणेच धार्मिक लांगूलचालनाचे राजकारण केले जात असल्याचा आरोप करत, समाज माध्यमातून शेलार आणि भाजपावर टीकेची झोड उठविण्यात येत आहे.मुंबईतील भाजपाचे वजनदार नेते असणाºया आशिष शेलार यांच्या पाठिंब्याने १७ डिसेंबर रोजी गिरगाव चौपाटीवर प्रभू येशू जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ५ ते रात्री १०पर्यंत चालणाºया या कार्यक्रमाला सर्वांना मोफत प्रवेश मिळणार आहे. ‘गूड न्यूज मेसेंजर’ या संकल्पनेखाली ख्रिस्ती धर्मोपदेश करणारे आचार्य विकास मेस्सी या कार्यक्रमात लोकांशी संवाद साधणार आहेत. स्वत: आशिष शेलार यांनी टिष्ट्वटरद्वारे लोकांना या कार्यक्रमाची माहिती देत, सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.शेलार यांच्या या आवाहनावर हिंदुत्ववादी आणि भाजपाबाबत सहानुभूती बाळगणाºयांनी समाजमाध्यमातून जोरदार नाराजी व्यक्त केली आहे. हिंदुत्वाची भलामण करणाºया पक्षाचे मुंबई अध्यक्ष आणि महत्त्वाचा नेताच मतांसाठी धार्मिक लांगूलचालन करत असल्याचा ठपका समाज माध्यमातून ठेवला जात आहे.‘महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांचे ख्रिश्चन प्रेम अचानक इतके उतू का जात आहे?’, ‘मी भाजपा समर्थक आहे, परंतु तीन वर्षांतच भाजपा नेत्यांना अहंगंड झाला असून, ते मुजोर झाले आहेत. त्यांना धडा शिकवायला हवा’, ‘ख्रिस्ती धर्मोपदेशक कधीपासून स्वत:ला आचार्य म्हणवू लागले, या कार्यक्रमाला ‘जन्मोत्सव’ संबोधणे म्हणजे सरळसरळ लोकांची फसवणूक आहे,’ अशा विविध प्रतिक्रियांचा पाऊसच आशिष शेलार यांच्या टिष्ट्वटरवर सध्या पडत आहे. शेलार हे समाज माध्यमात सक्रिय असणारे नेते आहेत. अनेक विषयांवर, आपल्या भागातील विकासकामांबाबत ते समाजमाध्यमात विशेषत: टिष्ट्वटरवर लिहीत असतात. आत्तापर्यंत त्यांनी दहा हजारांहून अधिक टिष्ट्वट केले आहेत. त्यातील बहुतांश टिष्ट्वटरवर एखाद दुसरी प्रतिक्रिया आणि २०-२५ रिटिष्ट्वट असा साधारण कल असतो, परंतु प्रभू येशूंच्या जन्मोत्सवाबाबत शेलार यांनी टिष्ट्वट करताच, तब्बल ६५८ लोकांना त्यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यातील बहुतांश प्रतिक्रिया नाराजी व्यक्त करणाºया आणि भाजपा नेत्यांवर धार्मिक दांभिकतेचा आरोप करणाºया आहेत. अनेकांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांना भाजपाची भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन केले आहे.आमदारकीसाठी पक्ष वेठीस-आशिष शेलार यांच्या मतदार संघात ख्रिश्चन आणि मुस्लीम समाजाची मतांची संख्या मोठी आहे. त्यांना जवळ करण्यासाठी शेलार सातत्याने अशा गोष्टी करत असतात. मागे त्यांनी ख्रिश्चनांनाही हजच्या धर्तीवर अनुदान देण्याची मागणी केली होती. धर्मांतराबाबतही त्यांची भूमिका खटकणारी आहे.स्वत:च्या मतदार संघातील समीकरणांसाठी शेलार मुंबई भाजपाला वेठीस धरत आहेत. त्यांनी हा कार्यक्रम आपल्या मतदारसंघातून घेतला असता, तर इतक्या टोकाच्या प्रतिक्रिया आल्या नसत्या, पण थेट चौपाटीवर कार्यक्रमाचे आयोजन पक्षाच्या विकासाभिमुख राजकारणाला धक्का देणारी आहे, अशी प्रतिक्रिया भाजपातील एका ज्येष्ठ नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केली आहे.
शेलारांच्या पाठिंब्याने येशू जन्मोत्सव: हिंदुत्ववाद्यांनी उठविली टीकेची झोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 2:56 AM