वाहतूक कोंडीचे शीळफाटा जंक्शन
By Admin | Published: August 3, 2016 03:24 AM2016-08-03T03:24:17+5:302016-08-03T03:24:17+5:30
वाहतुकीचा भार जास्त असल्याने कल्याण-शीळफाटा मार्गावर शीळफाटा सर्कलला नेहमीच वाहतूककोंडी होत आहे.
कल्याण : वाहतुकीचा भार जास्त असल्याने कल्याण-शीळफाटा मार्गावर शीळफाटा सर्कलला नेहमीच वाहतूककोंडी होत आहे. एकेक तास वाहतूक सुरळीत होत नसल्याने वाहनचालक व प्रवासी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे या कोंडीवर मार्ग काढण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.
राज्य रस्ते विकास महामंडळाने २३४ कोटी रुपये खर्चून भिवंडी-कल्याण-शीळ मार्ग विकसित केला. २००८ मध्ये महामंडळाने त्याचे गुपचूप उद्घाटन केले. तत्कालीन आघाडी सरकारमध्ये रस्त्याचे कंत्राट देण्यावरून आपसात वाद झाला होता. या रस्त्यावर कोन व काटई येथे दोन टोलनाके आहेत. ते बंद करण्याची जोरदार मागणी झाली होती. परंतु, ते पूर्णत: बंद झालेले नाहीत.
मुंबई-नाशिक मार्गाहून नवी मुंबईकडे येण्यासाठी भिवंडी बायपास रस्त्याने कल्याणमार्गे शीळफाट्याकडे यावे लागते. डोंबिवली एमआयडीसीतील कारखान्यांसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची वाहतूक याच मार्गाने होते. अंबरनाथ औद्योगिक वसाहतीतून एमआयडीसीने अत्यंत चांगल्या प्रकारे बदलापूर ते काटई नाक्यापर्यंत रस्ता तयार केला आहे. हा रस्ता डांबरी असला तरी चांगल्या स्थितीत असल्याने या मार्गाने माल वाहतुकीची वाहने काटईपर्यंत येतात. पुढे ती शीळमार्गे पुणे, नवी मुंबई, पनवेल, वाशी, मुंब्रा, ठाणे, मुंबईच्या दिशेने जातात. ठाण्यातून येणारी वाहने मुंब्रा बायपासने शीळफाट्याकडे येतात. पुढे ती नवी मुंबई, पुणे, पनवेल, तळोजाकडे मार्गक्रमण करतात. पुणे, कर्जत, रसायनी, चौल, खोपोली या भागांतून येणारी माल वाहतुकीची वाहने भिवंडी-वाडा गुजरातमार्गे अहमदाबादकडे जातात. या सगळ्यांचा ताण शीळफाट्याच्या सर्कलवर पडतो. रात्रीच्या वेळी या नाक्यावर वाहनांच्या रांगा लागतात. शीळफाटा ते पुढे कळंबोली-पनवेल मार्गावर अनेक लॉजिस्टिक पार्क आहेत. त्याठिकाणची सगळी जड वाहने शीळफाटामार्गे येतात. त्यामुळे वाहतुकीवर ताण पडतो. शीळफाटा चौकात वाहतूक पोलिसांना वाहतूक नियंत्रित करणे आवाक्याबाहेर जाते. शीळफाट्यानजीकची वाहतूककोंडी दूर करण्यासाठी केडीएमसीतील शिवसेना नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी आमदार सुभाष भोईर यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे.
>कल्याणमध्येही वाहतूक कोंडी
भिवंडी-कल्याण-शीळ रस्ता हा कल्याण शहरातून जात असल्याने खाडीपुलासह सहजानंद चौक, शिवाजी चौक आणि पत्रीपूल येथे प्रचंड वाहतूककोंडी होत आहे.
ही कोंडी फोडण्यासाठी १५ कोटी खर्चून एमएमआरडीएने गोविंदवाडी बायपास रस्ता तयार केला. हा रस्ता अद्याप वाहतुकीसाठी खुला झालेला नाही. त्यातील अडथळे दूर करून रस्ता खुला केला जाईल, अशी आश्वासने दर वेळी पाहणीदौऱ्यात दिली जातात. मात्र, रस्ता काही खुला होत नाही. दुर्गाडीनजीक कल्याण खाडीपुलास समांतर नवा पूल उभारण्याचे काम मंजूर झालेले आहे. त्याच्या कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही.
मोठागाव ठाकुर्ली-माणकोली खाडीपुलाची निविदा निघून सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लोटला आहे. पुलासाठी लागणाऱ्या भूसंपादनात एमएमआरडीएला अडथळे येत असल्याने पुलाचे काम रखडले आहे. हे दोन्ही खाडीपूल मार्गी लागल्यास शीळफाट्यावर येणारा वाहतुकीचा ताण काही अंशी कमी होण्यास मदत होऊ शकते.
शीळफाट्यातील कोंडी फोडण्यासाठी काटई येथे उड्डाणपूल प्रस्तावित आहे. हा प्रकल्प एमएमआरडीएद्वारे होणार आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री भिवंडी-कल्याण-शीळ मार्गावरील वाहतूककोंडी दूर करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांनी एलिव्हेटेड मार्ग तयार करून वाहतूककोंडी दूर करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. त्याची पाहणी करण्यात आली आहे.
वास्तविक, पाहता आघाडी सरकारने पहिल्या टप्प्यात भिवंडी-कल्याण-शीळ रस्त्याचा विकास केला होता. दुसरा टप्पा हा २६८ कोटींचा होता. त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होणार होती. दुसरा टप्पा बारगळल्याने वाहतूककोंडीचा सामना वाहकचालक व प्रवाशांच्या पाचवीला पूजला आहे.