"शिंदे-फडणवीस सरकारची नमो शेतकरी महासन्मान योजना म्हणजे नमो फसवी योजना" नाना पटोलेंचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2023 06:48 PM2023-06-03T18:48:43+5:302023-06-03T18:51:14+5:30
Nana Patole Criticize Shinde-Fadanvis Government: शिंदे फडणवीस सरकार म्हणजे घोषणांचा सुकाळ आणि अंमलबजावणीचा दुष्काळ अशी परिस्थिती आहे. घोषणा, इव्हेंट, जाहिरातबाजी यापलीकडे या सरकारचे दुसरे कोणतेही काम नाही.
मुंबई - केंद्र सरकारप्रमाणेच शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली आहे. या योजनेमधून राज्य सरकार केंद्र सरकारप्रमाणेच शेतकऱ्यांना ६ हजार रुपये मदत देणार आहे. या योजनेवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीकास्र सोडलं आहे. शिंदे-फडणवीस सरकारची नमो शेतकरी महासन्मान योजना म्हणजे नमो फसवी योजना आहे, असा टोला नाना पटोले यांनी लगावला आहे.
शिंदे फडणवीस सरकार म्हणजे घोषणांचा सुकाळ आणि अंमलबजावणीचा दुष्काळ अशी परिस्थिती आहे. घोषणा, इव्हेंट, जाहिरातबाजी यापलीकडे या सरकारचे दुसरे कोणतेही काम नाही. राजकीय सभा असो किंवा मंत्रीमंडळाची बैठक सगळीकडे फक्त घोषणाबाजी सुरु आहे. मंगळवारी ३० मे रोजी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत सरकारची हीच कार्यपद्धती दिसून आली. अनेक लोकोपयोगी घोषणा केल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे. ‘नमो’ शेतकरी महासन्मान योजना ही त्यापैकी एक आहे. केंद्र सरकारच्या शेतकरी सन्मान योजनेच्या अनुदानात थोडी भर घालून आम्हीच शेतक-यांना दरवर्षी १२ हजार रूपये देत आहोत असे दाखवण्याचा प्रयत्न शिंदे सरकार करत आहे. ही नवी योजना म्हणजे नमो फसवणूक योजना आहे. नरेंद्र मोदी यांनी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचे आश्वासन दिले होते त्याचे काय झाले?
आज राज्यातला शेतकरी अवकाळी पाऊस व गारपिटीने उद्ध्वस्त झाला आहे. कांदा, कापूस, सोयाबीन सह कोणत्याही शेतीमालाला भाव नाही. सरकारने वारंवार घोषणा केल्या पण अद्याप शेतक-यांना मदत मिळालेली नाही. या सरकारच्या घोषणा फक्त प्रसिद्धीसाठी असतात त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी मात्र होत नाही असे पटोले म्हणाले.