Maharashtra Politics: राज्यामध्ये शिंदे-फडणवीस सरकार आले आहे. ते २०१९ मध्ये यायला हवे होते, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. यानंतर पुन्हा एकदा आता राजकीय आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. यातच शिंदे गटातील एका मंत्र्यांने गौप्यस्फोट करत नवीन वर्षात मोठ्या घडामोडी घडू शकतात, असा दावा केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेरत्नागिरी दौऱ्यावर आहेत. यावेळी शिंदे गटातील मंत्री, नेते उपस्थित होते. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आमदार संपर्कात असल्याबाबतचे विधान केले आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी सरकार पडण्याचे दावे केले गेले. मात्र त्यात काहीही तथ्य नव्हते. तेव्हा १७० हा आमचा मेजॉरीटी आकडा आहे. मात्र, यानंतर आता आगामी काळात १० ते १२ आमदार आमच्या संपर्कात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही संपर्कात काही आमदार आहेत. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारच्या संख्याबळाचा आकडा १८० ते १८२ पर्यंत जाऊ शकतो. धमाका पाच महिन्यांपूर्वीच झाला, त्याचे पडसाद नव्या वर्षात आणखी दिसू शकतात, असा मोठा दावा उदय सामंत यांनी केला.
कितीही लोक आले तरी सरकार कधी घाबरत नाही
राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तारही रत्नागिरीत आहेत. महाविकास आघाडीच्या वतीने महामोर्चा काढला जाणार आहे. त्यावर बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले की, कितीही लोक आले तरी सरकार कधी घाबरत नाही. कायदा सुव्यवस्था कायम राहील, याची विरोधकांनी खबरदारी घ्यावी. शेवटी काही नियम असतात, काही धोरण असतात त्याचे पालन करावे आणि मोर्चा काढावा. आम्ही कुणाला अडवले नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे, असे सत्तार यांनी सांगितले.
दरम्यान, मनसेसोबतच्या युतीबाबत बोलताना, मनसेने कोणासोबत जायचे हे राज ठाकरे ठरवतील. राज ठाकरे हे राज्यातील प्रमुख नेत्यांपैकी एक नेते आहेत. त्यांनी कुणासोबत जावे हा त्यांचा निर्णय आहे. पण ते आमच्यासोबत आले तर वेलकम. आमच्या सर्व नेत्यांनी त्यांना सन्मानाने आमच्यासोबत येण्याचे आवाहन केले आहे. पण शेवटी निर्णय राज ठाकरे यांचा आहे. ते काय निर्णय घेतील हे कुणीही सांगू शकत नाही, असे सत्तार म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"