शिंदे गटाचे आमदार थेट शिवतीर्थावर, राज ठाकरेंसोबत तासभर चालली चर्चा; काय झालं बोलण?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2024 01:47 PM2024-04-06T13:47:52+5:302024-04-06T13:48:26+5:30
"राज ठाकरे आणि आमचे आधीपासूनच एक वेगळे नाते आहे. शिवसेना प्रमुखांच्या सभा मराठवाड्यात होत होत्या, तेव्हा राज ठाकरे त्यांच्यासोबतत आवर्जून असायचे. ज्या प्रमाणे शिवसेनाप्रमूख म्हणायचे की मनभेद नसावेत. तसेच त्यांचे आणि आमचे मनभेत कुठेही नाहीत."
शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी आज (शनिवार) मनसे प्रमुख राज ठाकरे यांची शिवतीर्थावर सदिच्छा भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल एक तास चर्चा झाल्याचे समजते. या संदर्भात बोलताना, राज ठाकरे आणि आमचे आधीपासूनच एक वेगळे नाते आहे. त्यांना भेटण्याची आणि गप्पा मारण्याची बऱ्याच दिवसांपासून इच्छा होती. मी कसल्याही प्रकारचा मेसेज आणला नाही. हे वरिष्ठ पातळीवर होत असते, असे आमदार शिरसाट यांनी म्हटले आहे. एवढेच नाही तर, राज ठाकरे महायुतीत आले तर, रेड कार्पेट टाकणाऱ्यांमध्ये आम्ही असणार, असेही शिरसाट यांनी म्हटले आहे.
राज यांच्या सोबत झालेल्या भेटीसंदर्भात एबीपी माझाशी बोलताना आमदार शिरसाट म्हणाले, "राज ठाकरे आणि आमचे आधीपासूनच एक वेगळे नाते आहे. शिवसेना प्रमुखांच्या सभा मराठवाड्यात होत होत्या, तेव्हा राज ठाकरे त्यांच्यासोबतत आवर्जून असायचे. ज्या प्रमाणे शिवसेनाप्रमूख म्हणायचे की मनभेद नसावेत. तसेच त्यांचे आणि आमचे मनभेत कुठेही नाहीत. राज ठाकरे यांना भेटण्याची आणि गप्पा मारण्याची बऱ्याच दिवसांपासून इच्छा होती. मात्र फारशी राजकीय चर्चा झाली नाही. जुन्या आठवणींना उजाळा दिला गेला."
"मी कसल्याही प्रकारचा मेसेज आणला नाही. हे वरिष्ठ पातळीवर होत असते. माझ्या सारख्याच्या माध्यमाने काही मेसेज जाईल, अशी कल्पनाही करू शकत नाही. त्यांना भेटणे, त्यांच्यासोबत चहा घेणे आणि गत काळात घडलेल्या घटनांना उजाळा देणे, एवढंच आज झालं," असे शिरसाट यांनी सांगितले.
तुमच्यासाठी रेड कार्पेट टाकणाऱ्यांमध्ये आम्ही असणार -
महायुतीत राज ठाकरे यांच्या येण्यासंदर्भात बोलताना शिरसाट म्हणाले, "राज ठाकरे यांना पहिल्यापासूनच सांगत आहोत की, साहेब आपण आलं पाहीजे. तुमच्यासाठी रेड कार्पेट टाकणाऱ्यांमध्ये आम्ही असणार आहोत आणि हे उघडपणे, सर्वांसमोर बोललो आहे. ते आलेच तर त्यांच्या ताकदीचा महायुतीला फायदाच होईल, ताकद वाढेल आणि जागा निवडून येतील."
कधीपर्यंत निर्णय होणार? काय म्हणाले राज ठाकरे? यावर बोलताना शिरसाट म्हणाले, "त्यांचे सर्व लक्ष सध्या त्यांच्या मेळाव्याकडे आहे. माझी जी मळमळ आहे, मी मेळाव्यात काढेन. त्यानंतर मला काय बोलायचे आहे, ते त्या मेळाव्यात तर बोलेनच, नंतर मी माझा निर्णय घेई, असे त्यांनी म्हटले आहे. पण आज त्यांच्या मनात काय सुरू आहे हे माहीत नाही. पण त्यांनी यावे, असे माझे वैयक्तिक मत आहे.