'शिंदे गट अपात्र होतील, हेच नियमाला धरुन असेल'; भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 01:58 PM2024-01-10T13:58:35+5:302024-01-10T14:17:23+5:30
पक्षांतर्गत बंदी कायद्यानुसार, घटनेनूसार जर अध्यक्षांनी निर्णय दिला, तर १०० टक्के शिंदे गट अपात्र होईल, असं भास्कर जाधव यांनी सांगितले
राज्याच्या राजकारणासाठी आजचा मोठा दिवस ठरणार आहे. काही तासांत गेल्या दीड वर्षांपासून सुरू असलेल्या राजकीय खेळाचा निकाल येणार आहे. एकनाथ शिंदे गट की उद्धव ठाकरे गट अपात्र ठरतो त्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर देणार आहेत. अशातच शिंदे गट अपात्र ठरल्यास पुढे काय? असा सवाल अनेकांच्या मनात उपस्थित होत आहे. याचदरम्यान ठाकरे गटाचे भास्कर जाधव यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.
पक्षांतर्गत बंदी कायद्यानुसार, घटनेनूसार जर अध्यक्षांनी निर्णय दिला, तर १०० टक्के शिंदे गट अपात्र होईल, असं भास्कर जाधव यांनी सांगितले. यात काही चुकीचा निर्णय झाला तर देशाच्या लोकशाहीवर परिणाम करणारा निर्णय असू शकेल. देशाची लोकशाही आणि संविधानाचा सन्मान राखायचा असेल सर्वोच्च न्यायालयाचा राखायचा असेल, तर आम्ही अपात्र होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असं स्पष्टीकरण भास्कर जाधव यांनी दिलं. शिंदे गटच अपात्र होतील, हेच नियमाला धरुन असेल, असं भास्कर जाधव म्हणाले. रत्नागिरीत त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
दरम्यान, गेल्या ५ महिन्यांपासून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी संबंधित प्रकरणातील दोन्ही बाजुंवरील सुनावणी घेतली. आता अखेर आज याबाबत निर्णय येणार आहे. याबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रतिक्रीया दिली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले, आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल आज दिला जाईल. कायद्याला धरून हा निकाल असेल. कायद्याच्या सर्व तरतुदींचे पालन करून हा निकाल दिला जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने जी मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत, त्याला अनुसरूनच हा निकाल असेल, असंही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले.
अध्यक्षांनी मेरिटवर निर्णय द्यावा- मुख्यमंत्री
विधानसभा अध्यक्षांचा अधिकृत निर्णय आल्यानंतर मी आपल्यासमोर भाष्य करणार आहे. तोपर्यंत मी एवढंच सांगेन की, शिवसेना पक्ष म्हणून अधिकृत मान्यता निवडणूक आयोगाने आम्हाला दिली आहे, तसंच धनुष्यबाण हे चिन्हही निवडणूक आयोगाने आम्हाला दिलं आहे. विधानसभेत आमच्याकडे ६७ टक्के बहुमत आहे आणि लोकसभेत ७५ टक्के बहुमत आमच्याकडे असल्याने निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. पण काही लोकं यामध्ये मॅच फिक्सिंगचा आरोप करतात. जे आरोप करतात त्यांचे काही लोक याआधी अध्यक्षांच्या दालनात जेवले आहेत. आम्ही त्यावर आक्षेप घेतला का?" असा खोचक सवाल मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला आहे. तसंच आमच्याकडे बहुमत असल्याने अध्यक्षांनी मेरिटवर निर्णय द्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
शिवसेना शिंदे गटातील कोणत्या १६ आमदारांचा समावेश?
- एकनाथ शिंदे
- भरत गोगावले
- संजय शिरसाठ
- लता सोनवणे
- प्रकाश सुर्वे
- बालाजी किणीकर
- बालाजी कल्याणकर
- अनिल बाबर
- चिमणराव पाटील
- अब्दुल सत्तार
- तानाजी सावंत
- यामिनी जाधव
- संदीपान भुमरे
- संजय रायमूळकर
- रमेश बोरनारे
- महेश शिंदे
उद्धव ठाकरेंच्या गटातील कोणत्या १४ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार?
- अजय चौधरी
- भास्कर जाधव
- रमेश कोरगावंकर
- प्रकाश फातर्फेकर
- कैलास पाटील
- संजय पोतनीस
- रवींद्र वायकर
- राजन साळवी
- वैभव नाईक
- नितीन देशमुख
- सुनिल राऊत
- सुनिल प्रभू
- उदयसिंह राजपूत
- राहुल पाटील