शिवसेना-भाजपात खडाखडी!
By Admin | Published: January 24, 2015 02:36 AM2015-01-24T02:36:57+5:302015-01-24T02:36:57+5:30
राज्यातील सत्तेत शिवसेना सहभागी होऊन जेमतेम दीड महिना होत नाही तोच भाजपा व शिवसेनेत खडाखडी सुरू झाली आहे.
वाक्युद्ध पेटले : आम्ही शेपूट घातले नाही -उद्धव; मग बाहेरून पाठिंबा द्या -खडसे
मुंबई : राज्यातील सत्तेत शिवसेना सहभागी होऊन जेमतेम दीड महिना होत नाही तोच भाजपा व शिवसेनेत खडाखडी सुरू झाली आहे. सत्तेत सहभागी झालो म्हणजे शेपूट घातली नाही, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला इशारा दिला. तर शिवसेनेच्या या टीकेचा समाचार घेताना महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी शिवसेनेला सरकार स्थिर करायचे होते, तर ते बाहेरूनही सरकारला पाठिंबा देऊ शकले असते, असा टोला लगावला आहे.
सरकारमधील शिवसेनेच्या मंत्र्यांना दिली जाणारी दुय्यम वागणूक, महापालिका निवडणुकांमध्ये स्वबळावर लढण्याची भाजपाची सुरू असलेली तयारी आणि शिवसेनेची महापालिकांत आर्थिक कोंडी करण्याचा भाजपाचा सुरू असलेला
प्रयत्न यामुळे शिवसेनेची अस्वस्थता बाहेर येत आहे.
राज्यातील सत्तेत सहभागी झाल्यापासून शिवसेनेचे मंत्री मूग गिळून गप्प होते. सत्तेची ऊब मिळाल्यामुळे शिवसेना मवाळ झाली, अशी टीका होत होती. (विशेष प्रतिनिधी)
मुंबई महापालिका निवडणुकीकरिता भाजपाने ‘मिशन १००’ निश्चित केले आहे. भाजपाचे नेते स्वबळावर महापालिका निवडणुका लढवण्याची भाषा करीत आहेत. हिंदुत्व व मराठी हे मुद्दे परस्परांकडून हिसकावून घेण्याची स्पर्धा सध्या सुरू आहे.
पंतप्रधानांवरही टीकास्त्र
केंद्रातील सरकारला बहुमत असताना ३७० वे कलम रद्द करणे, समान नागरी कायदा लागू करणे यासारखे निर्णय का होत नाहीत, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी करून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून टीकास्त्र सोडले.
सत्तेत बसायचे की विरोधात, ते ठरवा
पंतप्रधानांवरील टीका भाजपा खपवून घेणार नाही. शिवसेनेला सत्तेत बसायचे आहे की विरोधात, ते त्यांनी एकदा नक्की करावे आणि त्यानंतर भाजपाच्या नेतृत्वावर टीका करावी, असा इशारा भाजपाचे प्रमुख प्रवक्ते माधव भांडारी यांनी दिला.
कदमांची मुख्यमंत्र्यांवर टीका
यापूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी दोन नंबरचे पैसे कमावले व मराठी माणसांना घरे दिली नाहीत. आताच्या मुख्यमंत्र्यांनी पैसे न खाता मराठी माणसांना घरे द्यावी, अशा शब्दांत रामदास कदम यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागली.
...तर मग बाहेरून पाठिंबा द्या !
महसूलमंत्री खडसे यांनी उद्धव ठाकरे व रामदास कदम यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. शिवसेनेने सरकारमध्ये सहभागी होऊन टीका करण्यापेक्षा त्यांनी बाहेरून पाठिंबा द्यावा.