मुंबई - भाजप-शिवसेनेला संधी देऊनही सरकार स्थापन करण्याचा दावा करता आला नाही. दिलेल्या मुदतीत राष्ट्रवादीलाही ते शक्य नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस राष्ट्रपतींकडे केली आणि राष्ट्रपतींनी त्यावर सायंकाळी शिक्कामोर्तब केले. त्यामुळे राज्यात तिसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. मात्र, राष्ट्रपती राजवट लागू होण्यास भाजपाच जबाबदार असल्याचं शिवसेनेनं म्हटलं आहे.
राज्यपालांनी राष्ट्रवादीला मंगळवारी रात्री 8.30 वाजेपर्यंतची वेळ दिली होती. मात्र, मंगळवारी दुपारीच राष्ट्रवादीने अवधी वाढवून देण्याची विनंती राज्यपालांकडे केली. राज्यपालांनी त्यास नकार दिला. सरकार स्थापन करण्यात याप्रकारे तिन्ही पक्ष अपयशी ठरल्याने राज्यपालांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस राष्ट्रपतींकडे केली. केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यानंतर राष्ट्रपती राजवटीच्या आदेशावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली. त्यामुळे, राज्यातील सत्ता स्थापनेचा गोंधळ देशभर चर्चेचा विषय बनला आहे. शिवसेनेसोबत येण्यास काँग्रेसही राजी झाल्यामुळे या निर्णयाकडे देशाचे लक्ष लागले आहे. तर, भाजपाला सोडून शिवसेनेनं महाआघाडीसोबत घरोबा करण्याची तयारी दर्शवल्यामुळे शिवसेनेवरही टीका करण्यात येत आहे. त्यावरुन, शिवसेनेच्या अग्रलेखातून भाजपाचा समाचार घेण्यात आला आहे.
''सध्याच्या राजकारणात सब घोडे बारा टके या न्यायाने साधनशूचितेच्या गप्पा मारणारेच सगळ्यात जास्त गोंधळ व भेसळ करीत आहेत . महाराष्ट्रासारख्या राज्यात जो खेळ मांडला आहे त्यामुळे कुणाचा कंडू शमणार असेल तर त्याने जरूर खाजवत बसावे. शिवसेनेची पावले कोणत्या दिशेने पडत आहेत यावर टीका आणि टिप्पण्या करूद्यात. कश्मीरात मेहबुबा व बिहारात नितीशकुमार यांच्याशी 'घरोबा' करताना तत्त्वे आणि विचारांचे काय झाले? बिहारात जनादेश नितीशकुमार व लालू यादवांना होता. तो जनादेश मोडून भाजप व नितीशकुमारांचा 'पाट' लागलाच ना ! महाराष्ट्रात स्थिर राज्य यावे, ते लवकरात लवकर यावे, महाराष्ट्राच्या हिताचे व जनतेच्या कल्याणाचे काही घडावे हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना !
शिवसेनेस जे ठरले आहे ते देणार नाही, भले आम्ही विरोधी बाकड्यांवर बसू हा डावपेचाचा भाग नसून शिवसेनेस पाण्यात पाहण्याचा दुर्योधनी कावा आहे. कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात सत्ता स्थापन होऊ द्यायची नाही व राजभवनाच्या झाडाखाली बसून पत्ते पिसत बसायचे हा सर्व खेळ महाराष्ट्राची जनता पाहत आहे. काँग्रेस किंवा राष्ट्रवादीबरोबर नक्की काय करायचे ते आम्ही पाहू, असे म्हणत सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं पुन्हा एकदा भाजपवर बाण सोडले आहेत.