विशेष प्रतिनिधीमुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी वा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेनेशी संपर्क साधलेला नाही. त्यामुळे शिवसेनेला अंधारात ठेऊनच विस्तार होत असल्याचे सध्याचे तरी चित्र आहे.मोदी मंत्रिमंडळात अवजड उद्योग मंत्री असलेले अनंत गिते हे शिवसेनेचे एकमेव सदस्य आहेत. किमान दोन कॅबिनेट मंत्रीपदे द्यावीत, अशी शिवसेनेची सुरुवातीपासूनची मागणी आहे. शिवसेनेचे खा.अनिल देसाई यांना पूर्वी राज्यमंत्री पद देऊ करण्यात आले होते. तथापि, ‘आम्हाला दुसरेही कॅबिनेट मंत्रीपदच हवे’अशी भूमिका शिवसेनेने घेतली. तेव्हापासून एकाच कॅबिनेट मंत्रीपदावर ते शिवसेना लटकली आहे.मंत्रिमंडळ विस्ताराबाबत शिवसेनेशीच नव्हे तर जुन्या कोणत्याही मित्र पक्षाशी अद्याप भाजपने विचारविनिमय केलेला नाही. अण्णाद्रमुक, जदयुसारख्या नव्या नवरीस हळद लावण्याचे काम सुरू आहे, या शब्दात शिवसेनेच्या एका ज्येष्ठ खासदाराने नाराजी व्यक्त केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सातत्याने पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांवर टीका करत आहेत. विश्वसनीय सूत्रांनी सांगितले की, अनंत गिते यांना हटवून आपल्याला केंद्रीय मंत्रिपदाची संधी द्या यासाठी शिवसेनेचे अमरावतीचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव आणला आहे. आपल्या मंत्रिपदाचा शिवसेनेला विदर्भात फायदा होईल. राज्य मंत्रिमंडळात संजय राठोड (राज्यमंत्री) सोडले तर विदर्भाला राज्य मंत्रिमंडळातही प्रतिनिधीत्व नाही, असे मुद्दे त्यांनी रेटून धरले आहेत.
विस्ताराबाबत शिवसेना अधांतरीच, पंतप्रधान मोदी यांच्याकडून संपर्कही नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2017 5:56 AM