शिवसेनेची आटोपली, आता राष्ट्रवादीची बारी! अपात्रतेच्या सुनावणीची आज तारीख ठरणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 12:20 PM2023-12-29T12:20:35+5:302023-12-29T12:22:19+5:30
आता शिंदे गटाच्या आमदारांचे काय होणार, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहणार की अपात्र ठरणार आदी चर्चा सुरु असताना राष्ट्रवादीकडे अध्यक्षांनी लक्ष वळविले आहे.
राज्यातील दोन प्रादेशिक पक्ष गेल्या दीड वर्षात एकामागोमाग एक फुटले आहेत. आता कोणाचा पक्ष आणि कोण अपात्र याचा लढा सुरु झाला आहे. असे असताना शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेवरील सुनावणी पूर्ण झाली असून पुढील १०-१२ दिवसांत निकालही येणार आहे. त्यातच विधानसभा अध्यक्षांनी राष्ट्रवादीतील अपात्रतेच्या याचिकांवर सुनावणीची तयारी सुरु केली आहे.
उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर त्यांना पुन्हा मुख्यमंत्रीकरून पुढील प्रक्रिया केली असती, असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने एकनाथ शिंदे यांची नियुक्ती कायम ठेवली होती. तसेच अपात्रतेच्या याचिकेवर विधानसभा अध्यक्षाना निकाल देण्यास सांगितले होते. परंतू, अध्यक्ष काही केल्या सुनावणी घेत नव्हते म्हणून पुन्हा ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात गेला होता. यावर न्यायालयाने अध्यक्षांना ३१ डिसेंबरपर्यंत निर्णय घ्या, असे सुनावले होते. अध्यक्ष नार्वेकर यांनी सुनावणी पूर्ण केली असून निकाल देण्यासाठी काही आठवडे वाढवून देण्याची मागणी न्यायालयात केली होती. परंतू, न्यायालयाने फक्त १० दिवस वाढवून दिले होते.
आता शिंदे गटाच्या आमदारांचे काय होणार, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहणार की अपात्र ठरणार आदी चर्चा सुरु असताना राष्ट्रवादीकडे अध्यक्षांनी लक्ष वळविले आहे. अजित पवार गटाविरोधातील अपात्रतेच्या याचिकांवर सुनावणी घेऊन ३० जानेवारीपर्यंत निकाल द्यावा असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. यामुळे आज अजित पवार गटाच्या सुनावणीच्या तारखा निश्चित केल्या जाणार आहेत. जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यापासून नार्वेकर सुनावणी घेतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गटाच्या पक्ष आणि चिन्ह याबाबतच्या याचिका निवडणूक आयोगात आहेत. त्यावर सुनावणी देखील सुरु आहे. शिंदे गटाच्या आणि अजित पवार गटाच्या सुनावण्यांमध्ये हा मोठा फरक असणार आहे. शिंदे गटाला सुनावणी सुरु होण्यापूर्वीच निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह देऊन टाकले होते. आता शिंदे गटाच्या अपात्रतेवर काय निकाल येतो आणि राष्ट्रवादीवरून काय सुनावणी होते याकडे महाराष्ट्रातील राजकारण्यांचे लक्ष लागले आहे.