मंत्रिमंडळ विस्तार शिवसेनेने रोखला; आता राणेंना मंत्री करण्यासही विरोध
By यदू जोशी | Published: November 25, 2017 06:50 AM2017-11-25T06:50:27+5:302017-11-25T06:51:42+5:30
मुंबई : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यास आणि मंत्री करण्यास शिवसेनेने तीव्र विरोध दर्शविल्यामुळे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर टाकण्यात आल्याची विश्वसनीय माहिती आहे.
मुंबई : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यास आणि मंत्री करण्यास शिवसेनेने तीव्र विरोध दर्शविल्यामुळे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर टाकण्यात आल्याची विश्वसनीय माहिती आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी विस्तार होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वीच सांगितले होते. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधान परिषदेच्या एका जागेसाठी शिवसेनेचा पाठिंबा मिळविण्याकरिता काल ‘मातोश्री’ गाठून शिवसेना पक्षप्रमुख
उद्धव ठाकरे यांना पाठिंब्याचे साकडे घातले होते. नारायण राणे उमेदवार नसतील या अटीवर पाठिंबा देण्याची तयारी
ठाकरे यांनी दर्शविली होती. त्यावर राणे आमचे उमेदवार नसतील, असा निर्वाळा पाटील-तावडे यांनी दिल्याने पाठिंब्याचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र, ‘राणेंना मंत्रीदेखील करू नका’ असे ठाकरे यांनी या दोन्ही मंत्र्यांना स्पष्ट शब्दांत बजावले.
‘मातोश्री’वरील या घडामोडीनंतर भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची रात्री मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक झाली. राणेंना मंत्री करण्यास उद्धव यांचा सक्त विरोध असल्याचे तावडे-पाटील यांनी सांगितल्यानंतर मंत्रिमंडळाचा संभाव्य विस्तार लांबणीवर टाकण्याचा निर्णय झाला.
शिवसेनेचा विरोध पत्करून राणेंना मंत्री करण्याची घाई करू नये, असा भाजपाच्या नेत्यांचा बैठकीत सूर होता. अधिवेशन सुरळीत पार पाडायचे तर शिवसेनेचा विरोध परवडणार नाही. शिवाय, सध्या गुजरात विधानसभेच्या निवडणुकीचे दिवस आहेत. या परिस्थितीत ठाकरे आणि शिवसेनेच्या मुखपत्रातून आणखीच तोफ डागली गेली तर वातावरण अधिक खराब होईल. हा विचार करून विस्तार अधिवेशनानंतर करावा, असे मत बहुतेकांनी मांडले.
कर्जमाफी आणि इतर मुद्द्यांवरून विधिमंडळाच्या अधिवेशनात काँग्रेस-राष्ट्रवादी हे विरोधी पक्ष सरकारची कोंडी करण्याच्या तयारीत आहेत. अशा वेळी शिवसेनेच्या विरोधाने विरोधकांना बळ मिळेल. तेव्हा विस्तार नंतरही करता येऊ शकेल, तोवर शिवसेनेचे मन वळविता येऊ शकेल, असे मत भाजपाच्या दोन ज्येष्ठ नेत्यांनी व्यक्त केले.
>...तर वातावरण अधिक खराब होईल!
सध्या गुजरात विधानसभेच्या निवडणुकीचे दिवस आहेत. या परिस्थितीत ठाकरे आणि शिवसेनेच्या मुखपत्रातून आणखीच तोफ डागली गेली तर वातावरण अधिक खराब होईल. हा विचार करून विस्तार अधिवेशनानंतर करावा, असे मत बहुतेकांनी मांडले.