उस्मानाबाद – एकीकडे शिवसेना नेते संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांबद्दल केलेल्या विधानामुळे चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे शिवसेनेच्या(Shivsena) आणखी एका नेत्याने महाविकास आघाडीवर भाष्य केले आहे. जोवर उद्धव ठाकरे यांना वाटेल तोवरच महाविकास आघाडी सरकार टीकेल. सरकार चालवायचं तोपर्यंत चालवतील त्यानंतर पुढचा निर्णय घेतील असं माजी मंत्री संजय राठोड यांनी म्हटल्याने विविध तर्क लढवले जात आहेत.
उस्मानाबाद येथे संजय राठोड म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार टीकवायचं की नाही हे पूर्णपणे उद्धव ठाकरे यांच्या हातात आहे. सध्यातरी सरकार स्थिर आहे परंतु ते टिकवायचे की नाही? किती काळ टिकवायचं? हे सगळं उद्धव ठाकरे यांच्या हातात आहे. सरकारच्या स्थापनेपासून सरकार आता कोसळेल, इतक्या दिवसांत कोसळेल असं सांगितलं जात आहे. परंतु भाजपा(BJP) नेत्याचा दावा चुकीचा आहे. सरकार टिकवण्याचा निर्णय फक्त ठाकरेंच्या हातात आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्या कामगिरीचं कौतुक देशभरात झालं आहे. लोकांना शिवसेनेच्या सरकारचं काम आवडलं आहे. त्यामुळे भाजपाची सत्ता येणार वैगेरे यात काही तथ्य नाही असं सांगत संजय राठोड यांनी सर्व पक्षांना विनंती केलीय की, आरोप करून त्यामागचं तथ्य पुढे येण्याअगोदरच एखाद्याला शिक्षा देणं हा चुकीचा पायंडा आपल्याला बदलला पाहिजे. कुठल्याही पक्षात कार्यकर्ता बनायला अनेक वर्ष जातात. मी ३० वर्षाच्या राजकारणात ४ वेळा निवडून आलो आहे. माझ्यावर आरोप झाले. त्याची चौकशी होईल सत्य सगळ्यांसमोर येईल. काही तथ्य आढळलं तर शिक्षाही होईल. पण हा पायंडा बदला असं संजय राठोडांनी(Sanjay Rathod) आवाहन केले आहे.
पिंपरीत संजय राऊतांचा अजित पवारांवर निशाणा
पिंपरी चिंचवडमध्ये मेळाव्यावेळी संजय राऊत(Sanjay Raut) म्हणाले की, राज्यात मुख्यमंत्री आपले आहेत. अजितदादाही मुख्यमंत्र्यांचे ऐकतात. पुणे जिल्ह्यात आपलं कुणी ऐकत नाही असं कसं? अजित पवारांना सांगू आमचं ऐका नाहीतर मुख्यमंत्री आज दिल्लीत गेलेच आहेत असं त्यांनी विधान करताच सभागृहात हशा पिकला. मात्र यानंतर राऊत यांनी विधानावर विनोदी शैलीनं सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. चुकीचं ऐकू नका. माझं पूर्ण ऐका मग लिहा. उगाच ब्रेक्रिंग सुरू होईल. दिल्लीचे अंदाज बांधायला लागतील. आपल्याला दिल्लीवर राज्य करायचं. दिल्लीत ऑफिस कुठं आहेत. पंतप्रधान कुठे बसतात याचा अंदाज घेण्यासाठी मुख्यमंत्री दिल्लीत गेलेत असं त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार केवळ शिवसेनेची इच्छा असेपर्यंत टिकणार असं शिवसेना नेत्यांना वाटत असल्याचं त्यांच्या विधानातून दिसून येते.