मुंबईः शिवसेना नेते आणि 'सामना'चे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत यांचा हजरजबाबीपणा आणि हळूच चिमटा काढण्याची 'स्टाईल' सगळ्यांनाच माहीत आहे. त्याच हलक्याफुलक्या शैलीत त्यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उल्लेख 'डॉक्टर' असा केला. त्यामागचं कारण ठरलं, अजितदादांचंच एक वाक्य!
खासदार संजय राऊत यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनवर जाऊन भेट घेतली. स्वाभाविकच, या भेटीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं. कारण, अलीकडच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीवरून ज्या घडामोडी घडल्या, तेव्हा संजय राऊत यांनी 'राजभवन'वर काही टीकेचे बाण सोडले होते. राजभवन राजकारणाचा अड्डा बनू नये, अशी टिप्पणी त्यांनी केली होती. त्यामुळे राज्यपालांच्या भेटीनंतर त्यांचा ‘बाईट’ घेण्यासाठी राजभवनाबाहेर वृत्तवाहिन्या सज्ज होत्या. त्यांना पाहून संजय राऊत आपल्या कारमधून उतरून आले. त्यांचं पहिलं वाक्य होतं, ‘‘अजित पवार काल म्हणालेत बूम (माईक) लांब ठेवा. त्याने कोरोना होतो, असं ‘डॉक्टर’ अजित पवारांनी सांगितलंय.’’ त्यातही डॉक्टर या शब्दावर त्यांचा जरा जास्तच जोर होता. त्यांनी असा उल्लेख का केला असेल, ती गंमत असेल की चिमटा, हे सूज्ञांस सांगण्याची गरज नाही.
काय म्हणाले होते अजित पवार?
अजित पवार काल पुण्यात होते. महापालिका अधिकाऱ्यांसोबतची एक बैठक संपवून ते बाहेर आले, तेव्हा पत्रकार त्यांची वाटच बघत होते. पण, अजितदादांनी दुरूनच नमस्कार केला होता. कोरोना संपल्यावर मीडियाशी बोलेन, एवढंच मोघम बोलून ते पुढे निघाले. तेव्हा, काही जणांनी बूम माईक पुढे नेले. त्यावर, ते जवळ आणू नका, त्याने कोरोना होतो, असं म्हणत अजितदादांनी धूम ठोकली होती. त्यांच्या याच ‘संशोधना’बद्दल संजय राऊत यांनी त्यांना ‘डॉक्टर’ ही पदवी दिली आहे.
राज्यपालांना का भेटले राऊत?
दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासोबत काय चर्चा झाली, या प्रश्नावर, तुम्हाला का सांगू?, असा प्रतिप्रश्न संजय राऊत यांनी केला. राज्यपाल आमचे मार्गदर्शक आहेत. बरेच दिवस त्यांना भेटलो नव्हतो. म्हणून ही सदिच्छा भेट होती, असं ते म्हणाले. राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांचे संबंध मधुर आहेत, पित्रा-पुत्राच्या संबंधांसारखे आहेत आणि ते तसेच राहतील, असंही त्यांनी सांगितलं. राजभवनाला राजकारणाचा अड्डा बनवू नका, हे विधान देशभरातील घटनांबद्दल होतं. त्याला मुंबईच्या राजभवनाशी जोडू नका, असं म्हणत त्यांनी काहीसा सावध पवित्राही घेतला.
आणखी वाचाः
आज तर आकाशात 'काळे' कावळेही दिसले नाहीत; संजय राऊतांकडून भाजपाची खिल्ली
राज्य सावरण्यासाठी शरद पवारांची धडपड अद्भुत, राऊतांकडून कामाचं कौतुक