Shiv Sena Shinde Group: राज्याचे राजकारण अनेकविध मुद्द्यांवरून तापले असल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे आरक्षणाचा मुद्दा गाजताना दिसत आहे, तर दुसरीकडे आमदार अपात्रतेची सुनावणी सुरू आहे. याशिवाय अन्य काही गोष्टींवरूनही आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहे. यातच आता शिवसेना शिंदे गटाच्या दोन आमदारांची अपात्रतेतून सुटका होऊ शकते, असा दावा करण्यात आला आहे.
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीला आता वेग आला आहे. विधानसभा अध्यक्षांसमोर नियमित सुनावणी होत आहे. शिवसेना शिंदे गटाच्या दोन आमदारांवरील अपात्रतेची टांगती तलवार दूर होऊ शकते, असे सांगितले जात आहे. अशात विधान परिषदेतील दोन शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांची अपात्रतेचा धोक्यातून सुटकेची शक्यता आहे. आमदार मनिषा कायंदे आणि विप्लव बजोरिया यांच्या विधान परिषद आमदारकीचा कार्यकाळ काही महिन्यात संपणार आहे. आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल कधी लागणार हे अद्याप निश्चित नाही. त्यामुळे या दोन आमदारांचा यातून बचाव होण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
ठाकरे गटाकडून करण्यात आली होती अपात्रता याचिका
विधानसभेप्रमाणे विधान परिषदेतील आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात ठाकरे गटाने याचिका दाखल केली आहे. विधान परिषदेचे सभापतीपद सध्या रिक्त आहे. डॉ. नीलम गोऱ्हे या स्वत: आपल्याविरोधातील याचिकेवर सुनावणी घेऊन निर्णय देऊ शकत नाहीत. त्यामुळे या प्रकरणी सध्यातरी सुनावणी होण्याची चिन्हे धुसर असल्याचे सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार डॉ. मनिषा कायंदे आणि विप्लव बजोरिया यांनी शिंदे गटात प्रवेश केला. या तिघांविरोधात ठाकरे गटाने याचिका दाखल केली आहे.
दरम्यान, नीलम गोऱ्हे, मनिषा कायंदे, बजोरिया यांच्याविरोधात एकत्रित याचिका दाखल करण्यात आली आहे. ठाकरे गटाला तिघांविरोधातील याचिकेवर सुनावणी हवी आहे. पण सध्या ती प्रलंबित ठेवण्यात आली आहे.