मुंबई : शिवसेनेचे पक्षप्रमुख निवडण्यासाठीची औपचारिकता २३ जानेवारीला पूर्ण करण्यात येणार असून या पदावर पुन्हा उद्धव ठाकरे हेच विराजमान होणार आहेत. निवडणूक आयोगाच्या सक्तीनुसार पक्षप्रमुख निवडण्यासाठीची औपचारिकता रंगशारदातील पक्ष मेळाव्यात पूर्ण करण्यात येईल. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून ही २३ तारीख निवडण्यात आली आहे.पक्षप्रमुख पदासाठी ठाकरे यांचा एकट्याचाच अर्ज येईल आणि त्यावर शिक्कामोर्तब केले जाईल. शिवसेनेतील इतर पदाधिकारी नियुक्त करण्याचे अधिकार उद्धव यांच्याकडे आहेत. त्यानुसार ते पक्षाचे नेते, सचिव, उपनेते आदींची निवड करतील.सध्या पक्षात, सुभाष देसाई, दिवाकर रावते, रामदास कदम, गजानन कीर्तिकर, संजय राऊत, मनोहर जोशी, सुधीर जोशी आणि लीलाधर डाके हे आठ नेते आहेत. त्यातील दोघांना वगळून नवीन चेहरे दिले जाण्याची शक्यता आहे. विनायक राऊत, अनिल देसाई आणि आदेश बांदेकर हे तीन सचिव आहेत. त्यातील बांदेकर हे सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष तर अन्य दोघे खासदार आहेत. त्यासाठी एकनाथ शिंदे, अनंत गीते, आनंदराव अडसूळ, चंद्रकांत खैरे, डॉ. नीलम गोºहे ही नावे चर्चेत आहेत.>आदित्य ठाकरे नेतेपदी ?युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांना नेतेपदी नियुक्त केले जाईल, अशी चर्चा आहे. मात्र, सूत्रांनी सांगितले की, २३ तारखेला ही घोषणा होण्याची शक्यता कमी आहे. आदित्य यांना काही महिन्यांनंतर नेतेपद दिले जाऊ शकते. शिवसेनेची संघटनात्मक निवडणूक दर पाच वर्षांनी घेतली जाते. याआधी २३ जानेवारी २०१३ रोजी उद्धव यांची पक्षप्रमुखपदी एकमताने निवड करण्यात आली होती.
शिवसेनाही ‘निवड’णार पक्षप्रमुख, सचिव पदावर फेरबदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 4:41 AM