शिवसेनेच्या वचनपूर्ती सोहळ्यात अवतरली मराठी चित्रपटसृष्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2020 06:02 AM2020-01-24T06:02:20+5:302020-01-24T06:03:37+5:30
शिवसेनेच्या वचनपूर्ती सोहळ््यातील साडेतीन तासांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात मराठी चित्रपटसृष्टीतील तारांगण अवतरले होते.
मुंबई : शिवसेनेच्या वचनपूर्ती सोहळ््यातील साडेतीन तासांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात मराठी चित्रपटसृष्टीतील तारांगण अवतरले होते. भव्य मंचावर दिमाखदार दिलखेचक नृत्यांची रेलचेल होती. भव्यदिव्य मंच, चित्ताकर्षक रोषणाई अशा भारावलेल्या वातावरणात हा सोहळा वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्सच्या मैदानावर रंगला."
घरातला, हक्काचा माणूस मुख्यमंत्री झाला. कलेचे पुजारी, कलाकारांना खूप प्रेम देणारे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अशा भावना पार्श्वगायक शंकर महादेवन यांनी गणपती स्तवनाने कार्यक्रमाचा शुभारंभ करत व्यक्त केल्या.
शिवमणी यांच्या तालवादनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. पार्श्वगायक अवधूत गुप्ते यांनी सादर केलेल्या शिवसेना गीतावर शिवसैनिक थिरकले. ‘जात-गोत्र-धर्म आमचा...’ गाण्यावर शिवसैनिकांनी जल्लोष केला. शिवसेना सचिव आदेश बांदेकर, सुबोध भावे, अभिजित खांडकेकर, मधुरा वेलणकर, सुशांत शेलार, शरद केळकर, दिगंबर नाईक आदींनी सूत्रसंचालन केले.
माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, उद्योगमंत्री सुभाष देसाई, माजी मंत्री लीलाधर डाके, माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते व अरविंद सावंत, खासदार संजय राऊत आदी या वेळी उपस्थित होते.
महाराष्ट्राची लोकसंस्कृती
लोकनृत्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राची लोकसंस्कृतीच रंगमंचावर अवतरली. वासुदेवाचं दान पावलं, आई भवानीचा जागर झाला. तारपा नृत्य सादर करायला खास मोखाडा येथून आदिवासी बांधव आले होते. कोळी गीतांनाही उपस्थितांनी चांगली दाद दिली.
लावणी अप्सरांचा ठसका
अमृता खानविलकर आणि सोनाली कुलकर्णी यांनी अप्रतिम नृत्य सादर केले. पार्श्वगायक सुखविंदर सिंग यांनी ‘कर हर मैदान फतेह’ हे गीत शिवसेनेच्या विजयामागे शिवसैनिकांनी केलेल्या अथक परिश्रमाची आठवण करून देणारे ठरले. पार्श्वगायक कुणाल गांजावाला यांनी ‘खारी बिस्कीट’ आणि ‘पानिपत’ या चित्रपटांतील त्यांची गीते सादर केली.
अजय-अतुल यांची कृतज्ञता
संगीतकार अजय-अतुल यांनी बालपणी त्यांच्या पोवाड्याचे शिवसेनाप्रमुखांनी कौतुक केले होते, ही आठवण सांगतानाच त्यांनी पोवाड्याच्या काही पंक्तीही सादर केल्या. अभिनेता श्रेयस तळपदे यानेही मराठी-हिंदी गीतांवर ताल धरला. बेला शेंडे यांच्या सुरांनीही मोहिनी घातली.