शिवरायांच्या जयघोषांनी रायगड दुमदुमला, ३४५ वा शिवराजाभिषेक उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 04:37 PM2019-06-06T16:37:31+5:302019-06-06T18:18:23+5:30
शिवाजी महाराजांचे राज्य विश्ववंदनीय होते. त्यांची नीतिमत्ता, राजकारभाराच्या नीतिवर राज्य सरकारने अमल करण्याची गरज आहे, असे खासदार संभाजीराजे यांनी केले. यावेळी मराठा आरक्षण दिले पाहिजे, असेही आवाहन संभाजीराजे यांनी केले.
डॉ. प्रकाश मुंज
रायगड ः शिवाजी महाराजांचे राज्य विश्ववंदनीय होते. त्यांची नीतिमत्ता, राजकारभाराच्या नीतिवर राज्य सरकारने अमल करण्याची गरज आहे, असे खासदार संभाजीराजे यांनी केले. यावेळी मराठा आरक्षण दिले पाहिजे, असेही आवाहन संभाजीराजे यांनी केले.
शिवरायांच्या जयघोषांतअखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्यावतीने ३४५ वा राज्याभिषेक सोहळा गुरुवारी रायगड येथे पार पडला. यावेळी हजारों शिवप्रेमीच्या उपस्थितीत खासदार संभाजीराजेनी राजसदरेवरून शिवप्रेमींना संबोधित केले.
संभाजीराजे म्हणाले. रायगडावर पाण्याचे योग्य नियोजन केले जाईल. येथे १०० टक्के पाणीव्यवस्था केली जाईल. शिल्लक पाणी रायगड परिसरातील २१ गावांना देण्यात येईल. आतापर्यंत गडकिल्ल्यांसाठी काम करत आहे, इथून पुढे शेतकऱ्यांसाठी, बहुजनांसाठी काम करेन. गड-किल्ल्यांचे बिझनेस माँडेल बनविले आहे, ते केंद्र शासनाला सादर केले जाईल. शासनास विनंती आहे की बुलेट ट्रेन प्रमाणेच या प्रस्तावास भरघोस निधी द्यावी व किल्ले संवर्धन हे स्वतंत्र मंत्री खाते म्हणून मंजुरी द्यावी.
यावेळी चीनचे राजदूत लीयू बिन्ग, पोलंडचे राजदूत दमियन इरज्याक, सचिव इवा स्टेन्किइव्हीक्झ, तुनिसियाचे राजदूत नेज्मेद्दिन लखाल, बुलग्रीयाचे राजदूत इलेनोरा दिम्तीवा, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी अनिल पारस्कर, तहसीलदार चंद्रसेन पवार, कोल्हापुरचे माजी आयुक्त प्रभाकर देशमुख उपस्थित होते.
यावेळी चीनचे राजदूत लीयू बिन्ग म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे भारताचे नव्हे तर चीनचेही आदर्श आहेत. या कार्यक्रमासाठी इतिहास संशोधक, अभ्यासक, शिवभक्त, इतिहास प्रेमी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.
सोहळ्याला रयतेचे प्रातिनिधिक स्वरूपात उस्मानाबादमधील मेडशिंगा येथील आत्महत्या केलेल्या अवचट या शेतक-यांच्या कुटूंबाला उपस्थित राहण्याची संधी दिली. या शेतक-यांच्या कुटूंबियाच्या हस्ते पूजन झाले. त्यांना एक लाख रुपयांचा धनादेश दिला.
सात वाजता ध्वज पूजन व ध्वजारोहण झाले. यानंतर शाहिर रंगराव रंगराव पाटिल, आझाद नायकवडी यांनी शाहिरी गायिली. साडेनऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीचे आगमन झाले. यानंतर खासदार संभाजीराजे व शहाजीराजे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला.
यानंतर मेघडंबरीतील छत्रपती शिवाजी महाराजांना सुवर्ण नाण्यांचा अभिषेक घालण्यात आला. सोहळा पालखीचा, स्वराज्याच्या ऐक्याचा शिवराज्याभिषेक मुख्य पालखी सोहळा शिवमय वातावरणात पार पडला. जगदीश्वराचे दर्शन घेऊन पालखी सोहळ्याचा समारोप झाला.
यावेळी खासदार संभाजीराजे यांच्या हस्ते समाधीस्थळ पुष्पहार अर्पण करण्यात आले. इचलकरंजीतून पन्नास गाड्या मधून १२०० शिवप्रेमी रायगडावर उपस्थित होते. याचे नियोजन माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी केले होते. तेही यावेळी उपस्थित होते.