सांगा 'नारायण' नेमका कुणाचा ? शिवसेनेचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2018 09:34 PM2018-03-13T21:34:55+5:302018-03-14T08:15:38+5:30
भाजपाने नारायण राणेंना दिलेल्या राज्यसभेच्या उमेदवारीवरून शिवसेना आक्रमक झाली आहे. भाजपाने राज्यसभेची उमेदवारी दिलेले नारायण राणे नेमके कोणत्या पक्षात आहेत? त्यांनी नेमका कुठल्या पक्षाकडून राज्यसभा सदस्यत्वाचा अर्ज भरला, असा सवाल शिवसेनेने केला आहे.
मुंबई - भाजपाने नारायण राणेंना दिलेल्या राज्यसभेच्या उमेदवारीवरून शिवसेना आक्रमक झाली आहे. भाजपाने राज्यसभेची उमेदवारी दिलेले नारायण राणे नेमके कोणत्या पक्षात आहेत? त्यांनी नेमका कुठल्या पक्षाकडून राज्यसभा सदस्यत्वाचा अर्ज भरला, असा सवाल शिवसेनेने केला आहे.
राणेच्या उमेदवारीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करताना शिवसेना नेते अनिल परब म्हणाले, "नारायण राणे यांनी कोणत्या पक्षाकडून राज्यसभेचा अर्ज भरला? त्यांना भाजपने उमेदवारी दिली असेल तर त्यांनी भाजपाचे सदस्यत्व कधी स्वीकारले ? त्याची काही पावती ? ई मेल ? आहे का?"
"नेमके कोणत्या मार्गाने त्यांनी भाजपाचे सदस्यत्व स्वीकारले ? जर नारायण राणे यांनी सदस्यत्व स्वीकारले असेल तर त्यांनी त्यांच्या स्वाभिमान पक्षाचा राजीनामा दिला का ? कारण एका पक्षाचा अध्यक्ष दुसऱ्या पक्षाचा सदस्य होऊ शकत नाही आणि जर दुसऱ्या पक्षाच्या अध्यक्षाला एखाद्या पक्षाला उमेदवारी द्यायची असेल तर त्याला आधी पक्षाचा अधिकृत सदस्य करून घ्यावा लागेल. तरच त्याला पक्षाला बी फॉर्म देता येईल, असे नियम आहेत. त्यामुळे नारायण राणे यांना भाजपने सदस्यत्व कधी दिले ? जर दिले नसेल तर राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी कशी दिली? असा सवाल परब यांनी केला आहे.