Sanjay Raut : "या, मला अटक करा, माझी मान कापली तरी..."; ईडीने समन्स बजावताच संजय राऊत संतापले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 01:27 PM2022-06-27T13:27:43+5:302022-06-27T13:33:35+5:30
Shivsena Sanjay Raut : संजय राऊत यांना मंगळवारी चौकशीला हजर राहण्याचे आदेशही देण्यात आलेत. यानंतर आता यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई - शिवसेनेचे नेते संजय राऊत (Shivsena Sanjay Raut) बंडखोर आमदारांवर सातत्याने निशाणा साधत आहेत. दरम्यान, आता संजय राऊत यांना ईडीने समन्स बजावलं आहे. राज्यात सत्तासंघर्ष पराकोटीला पोहोचला असताना राऊत यांना ईडीनं समन्स बजावलं आहे. पत्राचाळ जमीन खरेदी घोटाळा प्रकरणी त्यांना हे समन्स बजावण्यात आलंय. संजय राऊत यांना मंगळवारी चौकशीला हजर राहण्याचे आदेशही देण्यात आलेत. यानंतर आता यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
"माझी मान कापली तरी मी गुवाहाटीचा मार्ग स्विकारणार नाही. या.. मला अटक करा!" असं म्हटलं आहे. संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "मला आताचा समजले ED ने मला समन्स पाठवले आहे. छान. महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. आम्ही सगळे बाळासाहेबांचे शिवसैनिक मोठ्या लढाईत उतरलो आहोत. मला रोखण्यासाठी... हे कारस्थान सुरू आहे. माझी मान कापली तरी मी गुहातीचा मार्ग स्विकारणार नाही. या... मला अटक करा! जय महाराष्ट्र!" असं राऊत यांनी म्हटलं आहे.
मला आताचा समजले ED ने मला समन्स पाठवले आहे.छान.महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. आम्ही सगळे बाळासाहेबांचे शिवसैनिक मोठ्या लढाईत उतरलो आहोतमला रोखण्यासाठी..हे कारस्थान सुरू आहे.माझी मान कापली तरी मी गुहातीचा मार्ग स्विकारणार नाही.या..मला अटक करा!
— Sanjay Raut (@rautsanjay61) June 27, 2022
जय महाराष्ट्र!@Dev_Fadnavispic.twitter.com/jA1QcvzP7a
२००६ मध्ये जॉईंट व्हेन्चरनुसार गुरू आशिष या विकासकानं पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प हाती घेतला. हा प्रकल्प २००८ मध्ये सुरू झाला. परंतु दहा वर्षांनंतरही हा पुनर्विकास न झाल्याचं लक्षात आलं. पत्राचाळीत विकासकांनी चार चार लोकांना एफएसआय विकला आणि जॉनी जोसेफ कमिटीच्या शिफारसीनुसार कंत्राट देण्यात आलं. ६७२ मराठी माणसांना यात घरं रिकामी करायला लावली.
गोरेगावमधील पत्राचाळ घोटाळा जवळपास १०३४ कोटींचा आहे. याच घोटाळ्याची चौकशी ईडीकडून सुरू आहे. या अंतर्गत प्रवीण राऊत यांची ७२ कोटींची मालमत्ता याआधी जप्त करण्यात आलेली आहे. त्यानंतर संजय राऊत यांच्या पत्नीशी निगडीत जागांवर ईडीकडून कारवाई करण्यात आली होती.