मुंबई – बिहारमध्ये राजद, काँग्रेस आणि मांझी यांच्यासोबत आघाडी करून नितीश कुमार यांनी भाजपाला सत्तेतून बाहेरचा रस्ता दाखविला आहे. भाजपाने जदयू फोडण्यासाठी ऑपरेशन लोटस चालविल्याचा आरोप नितीश कुमार यांनी केला आहे. यातून सावध होत त्यांनी पक्ष वाचविला, असा दावा केला आहे. असे असताना भाजपाने आपण महाराष्ट्रात शिवसेना का फो़डली हे सांगत नितीश कुमार यांना एकप्रकारे इशाराच दिला आहे. सुशीलकुमार मोदी यांनी शिवसेनेने देखील महाराष्ट्रात असाच विश्वासघात केला होता, म्हणून आम्ही शिवसेना फोडली. ज्यांनी आमचा विश्वासघात केला त्यांनाच आम्ही तोडले असं म्हटलं आहे. याच दरम्यान आता शिवसेनेने भाजपावर निशाणा साधला आहे.
"शिवसेना संपवणारा माणूस अजून जन्मालाच आलेला नाही आणि येणारही नाही" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत (Shivsena Vinayak Raut) यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे. "भाजपाच्या त्रासाला कंटाळून नितीश कुमार आता भारतीय जनता पक्ष सोडून गेले. शिवसेनेला परिणाम भोगावे लागणार नाही. सुशील मोदी किंवा आणखी कुणीच शिवसेना संपवू शकणार नाहीत. आमदार, खासदार विकत घेतले तरी शिवसेना संपवू शकत नाही" असं विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.
"महाराष्ट्रातील शिवसेना, देशातील शिवसेना ही भारतीय जनता पक्षाच्या कपटकारस्थानामुळे पूर्वी पेक्षा आता अधिक गतीने उभी राहते. भले 40 आमदार, 12 खासदार विकत घेतले असतील परंतू शिवसेना तुम्ही संपवू शकत नाही. शिवसेना संपवणारा माणूस अजून जन्मालाच आलेला नाही आणि येणारही नाही" असं म्हणत विनायक राऊत यांनी भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे. TV9 मराठीशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे.