सत्तेसाठी शिवसेनेची नौटंकी
By admin | Published: October 27, 2016 01:15 AM2016-10-27T01:15:50+5:302016-10-27T01:15:50+5:30
एकीकडे सत्तेत राहून सगळे फायदे लाटायचे आणि पुन्हा त्याच सत्तेच्या विरोधात बोलायचे ही शिवसेनेची नौटंकी आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे
मुंबई : एकीकडे सत्तेत राहून सगळे फायदे लाटायचे आणि पुन्हा त्याच सत्तेच्या विरोधात बोलायचे ही शिवसेनेची नौटंकी आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत केली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत समविचारी पक्षांशी आघाडी करण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर देण्यात आल्याचेही ते म्हणाले.
राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात आज स्थानिक निवडणुकांचा जिल्हानिहाय आढावा घेण्यात आला. या वेळी आघाडी करण्याचे अधिकार स्थानिक पातळीवरील नेत्यांवर सोपविण्यात आले. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगले यश मिळेल, असा विश्वास या वेळी तटकरे यांनी व्यक्त केला. (विशेष प्रतिनिधी)
राष्ट्रवादी युवती काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी स्मिता पाटील
माजी गृहमंत्री दिवंगत आर.आर. पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील
यांची राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात
आली, तर ओबीसी सेलच्या प्रदेशाध्यक्षपदी ईश्वर बाळबुधे यांची नियुक्ती करण्यात आली.
राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शेखर गोरे यांच्यासह भाजपा, काँग्रेस, शिवसेना, मनसे पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
भास्कर जाधव पक्ष सोडणार नाहीत
- माजी मंत्री भास्कर जाधव हे आमच्या पक्षातील महत्त्वाचे नेते असून ते पक्ष सोडून जाणार नाहीत. रत्नागिरी जिल्ह्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्यांच्याच नेतृत्वाखाली लढविल्या जातील, असे स्पष्टीकरण प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी दिले.
- पक्ष संघटनेवर नाराज असलेले जाधव राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपात जाणार असल्याची चर्चा आहे. यावर तटकरे म्हणाले, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण करण्यासाठी सत्ताधारी पक्षांकडून वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न केले जातात व त्यासाठीच एखाद्या नेत्याच्या नाराजीच्या बातम्या पसरवल्या जातात. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एकजूट असून नेत्यांच्या नाराजीच्या बातम्या या निराधार असल्याचे तटकरे म्हणाले.