सिद्धिविनायकला सुरक्षेचे कवच!
By admin | Published: January 24, 2015 02:01 AM2015-01-24T02:01:19+5:302015-01-24T02:01:19+5:30
केंद्रीय गुप्तहेर संघटनांनी दिलेल्या अॅलर्टनंतर प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिराला सशस्त्र पोलिसांनी वेढा घातला आहे.
मुंबई : केंद्रीय गुप्तहेर संघटनांनी दिलेल्या अॅलर्टनंतर प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिराला सशस्त्र पोलिसांनी वेढा घातला आहे. बंदोबस्तासोबत शीघ्र कृती दलाचे जवानही मंदिराबाहेर पहारा देताना दिसत आहेत.
पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनांची चार पथके देशात शिरली असून, २८ जानेवारीआधी ती महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि ओडिशा या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर घातपात घडविण्याच्या तयारीत आहेत.
यापैकी एक पथक महाराष्ट्रात धडकले असून, मुंबईतले सिद्धिविनायक मंदिर मुख्य लक्ष्य आहे. मंगळवारी मंदिरावर हल्ला होऊ शकतो, अशी नेमकी माहिती केंद्रीय गुप्तहेर संघटनांकडून मुंबई पोलिसांना प्राप्त झाली आहे. त्यानंतर लगेचच हालचाल करून सिद्धिविनायक मंदिराच्या सुरक्षेसाठी ८ अधिकारी आणि सुमारे २०० शिपायांचा बंदोबस्त दोन पाळ्यांमध्ये देण्यात आला आहे. त्यासोबतच शीघ्र कृती दलाचे सशस्त्र जवानही मंदिराला चहूबाजूने वेढा घालून आहेत. हे अॅलर्ट प्राप्त होताच स्थानिक पोलीस ठाण्यातील वरिष्ठ निरीक्षक निशिकांत पाटील यांनी सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासासोबत सुरक्षेबाबत चर्चा केली. या बैठकीला मंदिराच्या आवारातले स्टॉलधारक आणि आसपासच्या सोसायट्यांमधील सभासद उपस्थित होते. या वेळी पोलिसांनी मंदिरातील अंतर्गत सुरक्षेचा आढावा घेतला. प्रवेशद्वारावरील मेटल डिटेक्टर, सीसीटीव्ही यंत्रणा, नियंत्रण कक्षातील स्क्रीन सुस्थितीत आहेत का याचीही चाचपणी केली. या नियंत्रण कक्षात मंदिरातील प्रत्येक क्षणी घडणाऱ्या घडमोडींवर नजर आहे का, मंदिरात येणाऱ्या प्रत्येकाची योग्य पद्धतीने झाडाझडती घेतली जाते का, याचीही तपासणी पाटील यांनी केली.अॅलर्टमध्ये अत्यंत नेमक्या शब्दांत सिद्धिविनायक मंदिराबाबत माहिती देण्यात आल्याने मुंबई पोलिसांनी ही बाब अत्यंत गंभीरतेने घेतली आहे. मंदिरासह शहरातील सर्वच संवेदनशील आणि महत्त्वाच्या-अतिमहत्त्वाच्या आस्थापना, प्रार्थनास्थळे, गर्दी खेचणारे मॉल, बाजारपेठा, रेल्वे स्थानके, बस डेपोवरील सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. सर्वच ठिकाणांभोवतीची गस्तही वाढविण्यात आली आहे. त्यासोबतच खबरदारीचे उपाय म्हणून नाकाबंदी, कोम्बिंग आॅपरेशन पोलिसांकडून सुरू करण्यात आले आहे.
अफवा पसरवू नका
मुंबई पोलिसांनी शहरवासीयांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे; सोबत अफवा पसरवू नका आणि अफवांवर विश्वास ठेवू नका, असेही कळकळीचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.