बहुचर्चित पाणबुडी प्रकल्प अखेर सिंधुदुर्गला मिळाला, केंद्राकडून ४७ कोटी मंजूर 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2024 11:57 AM2024-11-30T11:57:17+5:302024-11-30T11:57:35+5:30

मार्चमध्ये प्रकल्पाचे लोकार्पण होण्याची शक्यता

Sindhudurg finally gets the much talked about submarine project, 47 crores sanctioned by the Centre  | बहुचर्चित पाणबुडी प्रकल्प अखेर सिंधुदुर्गला मिळाला, केंद्राकडून ४७ कोटी मंजूर 

बहुचर्चित पाणबुडी प्रकल्प अखेर सिंधुदुर्गला मिळाला, केंद्राकडून ४७ कोटी मंजूर 

संदीप बोडवे

मालवण (जि. सिंधुदुर्ग) : बरीच वर्षे प्रतीक्षा असलेला बहुचर्चित पाणबुडी प्रकल्प अखेर सिंधुदुर्ग जिल्ह्यात साकारण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. केंद्र सरकारने या प्रकल्पासाठी ४७ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. दरम्यान, येत्या मार्च महिन्यात यासाठीची पाणबुडी सिंधुदुर्गात आणली जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

महाराष्ट्र पर्यटन मंत्रालयाने पर्यटन पाणबुडी खरेदी करण्यासाठी ऑर्डर काढली असल्याची माहिती मिळाली आहे. या पाणबुडीसाठी ४६.९१ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. केंद्र सरकारकडून सिंधुदुर्गातील पाणबुडी प्रकल्पाला निधी मंजूर केल्यामुळे या प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे. मार्च अखेरपर्यंत पर्यटनासाठीची पाणबुडी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होणार असून, याच वेळी तिचे राज्य सरकारच्या वतीने मोठ्या दिमाखात लोकार्पण केले जाणार आहे.

सिंधुदुर्गच्या पर्यटन विश्वासाठी चांगली बातमी

भारतीय उपखंडात कोठेही नसलेला असा पाणबुडी पर्यटनाचा प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यात होऊ घातला आहे. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा देशाचा पर्यटनात एक वेगळाच रुतबा निर्माण होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन पाणबुडी प्रकल्प हा जागतिक दर्जाच्या संकल्पनेवर आधारित असणार आहे. सिंधुदुर्गचे पर्यटन या प्रकल्पामुळे एका वरच्या उंचीवर पोहोचण्यास मदत होणार असल्याचे पर्यटनविश्वातील अभ्यासकांचे म्हणणे आहे.

असा असणार पाणबुडी प्रकल्प

सिंधुदुर्गात साकारल्या जाणाऱ्या पर्यटन पाणबुडी प्रकल्पात पर्यटकांना पाणबुडीत बसून पाण्याखालील विश्व जवळून न्याहाळता येणार आहे. या प्रकल्पामुळे पहिल्या वर्षी पाच हजार जणांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगाराची संधी निर्माण होणार आहे; तर शंभर ते दीडशे कोटींची उलाढाल या प्रकल्पामुळे शक्य होणार आहे.

Web Title: Sindhudurg finally gets the much talked about submarine project, 47 crores sanctioned by the Centre 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.