सातारा: खुर्द येथील रोहित बनसोडे हा युवक गाव पाणीदार बनवण्यासाठी स्वत: श्रमदान करीत असून, त्याला साथ देत आहे त्याची बहीण रक्षिता! राज्याच्या दुष्काळमुक्तीसाठी या भाऊ-बहिणीचा आदर्श युवा पिढीने घेण्यासारखा आहे.गोंदवले खुर्द गावातील रोहित शंकर बनसोडे हा १६ वर्षीय युवक व्यायामासाठी घरापासून दोन किलोमीटरवरील जानाई तलाव परिसरात जात होता. त्याच माळरानावर दिसणाºया उजाड- बोडक्या टेकड्यांवर पाणी अडवण्याचे काम आपण केले, तर पाणीप्रश्न निकाली निघू शकतो, हे त्याच्या मनात आले. त्यानंतर तो व्यायामाला येताना दररोज खोर-टिकाव, पाटी घेऊन येऊ लागला. पाणी अडविण्यासाठी त्याने खोदकाम सुरू केले. काही दिवसांपासून आपला भाऊ करीत असलेले श्रमदान पाहून, त्याची १३ वर्षीय बहीण रक्षिताही मदतीला पुढे सरसावली.या दोघांनी मिळून ३५ सीसीटी बांध व १ मातीबांध जानाई तलाव परिसरात तयार केला, ही माहिती समजताच माजी आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या पत्नी अनुराधा देशमुख यांनी या ठिकाणी पाहणी केली. त्या हे काम पाहून प्रभावीत झाल्या आणि त्यांनी ड्रीम फाउंडेशनच्या माध्यमातून या बहीण-भावाचा एका वर्षाचा शाळेचा खर्च करण्याचे घोषित केले.गावाला पाणीदार बनविणारमाण तालुक्यातील गोंदवले खुर्द या गावाने पाणी फाउंडेशनच्या वॉटरकप स्पर्धेत भाग घेतलेला नाही. मात्र या गावातील रोहित बनसोडे आपल्या गावाला पाणीदार बनवण्यासाठी एकटाच लढा देत आहे. हे अतिशय स्तुत्य पाऊल असल्याचे माजी आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या पत्नी अनुराधा देशमुख यांनी सांगितले.माझ्या वयाची मुले आज मोबाइल आणि अन्य निरर्थक गोष्टींत गुंतून पडली आहेत. मी इतरांपेक्षा वेगळे काम करीत आहे. हाच आदर्श अन्य मुलांनीही घ्यावा. या श्रमदानातून माझा व्यायाम होत आहे. माझ्या व बहिणीच्या घामाने गावाला पाणीदार बनवणार आहे.- रोहित बनसोडेगोंदवले खुर्द (ता. माण, जि. सातारा) येथे रोहित आणि रक्षिता हे बहीण-भाऊ गावाला पाणीदार बनविण्यासाठी श्रमदान करत आहेत.
दुष्काळमुक्तीसाठी बहीण-भावाचा लढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 12:55 AM