पश्चिम महाराष्ट्रात सहा हजार कोटींचे रस्ते; सार्वजनिक बांधकाम विभागाचे पाच जिल्ह्यांसाठी नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 06:13 AM2018-01-08T06:13:06+5:302018-01-08T06:13:56+5:30
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर या पाच जिल्ह्यांमधील ३० रस्त्यांची कामे करण्यात येणार असून ‘हायब्रीड अॅन्यूईटी’ कार्यक्रमांतर्गत तब्बल पाच हजार ९५२ कोटी रुपये खर्चून हे रस्ते बांधण्यात येणार आहेत.
लक्ष्मण मोरे
पुणे : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर या पाच जिल्ह्यांमधील ३० रस्त्यांची कामे करण्यात येणार असून ‘हायब्रीड अॅन्यूईटी’ कार्यक्रमांतर्गत तब्बल पाच हजार ९५२ कोटी रुपये खर्चून हे रस्ते बांधण्यात येणार आहेत. या रस्त्यांची लांबी जवळपास १ हजार ८२८ किलोमीटरची असणार आहे. त्यासाठीची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आलेली असली, तरी केंद्र शासनाच्या नियमानुसार आर्थिक निकषांमध्ये बसणा-या ठेकेदारांनाच हे काम देण्यात येणार आहे. मात्र, अशा ठेकेदारांची संख्या कमी असल्याने अडचणी उद्भवण्याचीही शक्यता आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पुणे विभागामध्ये ‘हायब्रीड अॅन्यूईटी’ कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत विभागातील ३० रस्त्यांची निर्मिती केली जाणार आहे. अस्तित्वात असलेल्या रस्त्यांची सुधारणा करणे आणि काही रस्त्यांची नव्याने बांधणी करणे अशा प्रकारची कामे करण्यात येणार आहेत. प्रत्येक रस्त्याचे काम हे अंदाजे सव्वाशे ते दीडशे कोटी रुपयांचे असणार आहे. या कामासाठी केंद्र शासनाच्या आर्थिक निकषांमध्ये बसणारे ठेकेदाराच निवडले जाणार आहेत. मात्र, अशा ठेकेदारांची संख्या कमी असल्याने कदाचित काही ठेकेदार एकत्र येऊन निविदा भरण्याची शक्यता आहे.