वांद्रे शासकीय वसाहतीमध्ये होणार स्मार्ट सिटी
By admin | Published: August 31, 2015 02:02 AM2015-08-31T02:02:03+5:302015-08-31T02:26:24+5:30
वांद्रे (पूर्व) येथील शासकीय वसाहतीच्या ९३.६२ एकर जमिनीवर छोट्या आकाराचे स्मार्ट शहर विकसित करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला
संदीप प्रधान, मुंबई
वांद्रे (पूर्व) येथील शासकीय वसाहतीच्या ९३.६२ एकर जमिनीवर छोट्या आकाराचे स्मार्ट शहर विकसित करण्याचा निर्णय
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला असून, त्याकरिता मास्टर प्लान तयार करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत.
एखाद्या स्मार्ट सिटीमध्ये कोणकोणत्या सुविधा असणे गरजेचे आहे त्याचे हे मिनिएचर असेल व केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत सहभागी शहरांचा विकास या मॉडेलच्या धर्तीवर करण्याची दिशा त्याद्वारे दिली जाणार आहे. वांद्रे येथील शासकीय वसाहतीच्या विकासाचे घोंगडे अनेक वर्षे
भिजत पडले आहे. याकरिता यापूर्वी आकृती सिटी लि., काकडे इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि., डी.बी. रियालिटी प्रा.लि. यांनी निविदा दिल्या होत्या. मात्र हे प्रस्ताव प्रत्यक्षात येऊ शकले नाही. त्यामुळे हे सर्व प्रस्ताव रद्द करून विकासाचा नवा मास्टर प्लान तयार करण्याचे आदेश फडणवीस यांनी दिले. सध्याच्या वसाहतीमधील रहिवाशांचे पुनर्वसन केल्यावर उरलेल्या जागेत मनोरंजन मैदाने, क्रीडांगणे, सिनेमागृहे, मॉल, मार्केट, उद्याने, शाळा, महाविद्यालये अशा विविध सोयीसुविधा असलेले शहर उभे केले जाणार आहे. मुंबई महापालिकेच्या प्रस्तावित विकास आराखड्यातील आरक्षणे लागू करून हे स्मार्ट शहर उभे केले जाणार आहे. मास्टर प्लान मंजूर झाल्यावर निविदांद्वारे विकासक नियुक्त केला जाणार आहे.
वांद्रे येथील वांद्रे-कुर्ला संकुलातही रस्ते, पार्कींग, वायफाय, अशा अनेकविध सुविधा पुरवून एक स्मार्ट कमर्शियल कॉम्प्लेक्स उभा करण्याची मुख्यमंत्र्यांची योजना आहे. त्यामुळे त्याच्या शेजारी स्मार्ट सिटी उभारून केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या राज्यातील दहा शहरांसमोर एक मॉडेल उभे करण्याचा सरकारचा विचार आहे.