लोणावळा : पोलीस खात्याला अभिमान वाटावा असे तपास काम व सोबत कार्यालयाची व्यवस्था राखल्याबद्दल पुणे जिल्ह्यातील पहिले स्मार्ट आयएसओ म्हणून लोणावळा ग्रामीण पोलीस ठाणे व लोणावळा उपविभागीय पोलीस कार्यालय यांना गौरविण्यात आले आहे. लोणावळा शहर पोलीस ठाण्याला देखिल पुणे जिल्ह्यातील स्मार्ट आयएसओ प्रमाणपत्र देऊन पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर शिवथरे, लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक रामदास इंगवले, लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील यांचा पुणे ग्रामीणच्या गुन्हे आढावा बैठकीमध्ये हे मानांकन देऊन गौरव करण्यात आला.
तिनही पोलीस अधिकारी व त्यांचे कर्मचारी तसेच लोणावळा शहरचे तत्कालिन पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबत गुन्हे कमी करत घडलेले गुन्हे तपास कामात केलेली उत्कृष्ट कामगिरी, कार्यालयांचा स्मार्टनेस, पोलीस ठाण्यात येणार्या नागरिकांना दिली जाणारी आदराची वागणूक या सर्व बाबी ध्यानात घेऊन हे पहिले स्मार्ट आयएसओ मानांकन देण्यात आले आहे.